आयएसएल फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन ठरले एफसीसाठी जादूगर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

ओवेन कॉयल गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीसाठी जादूगर ठरले. डळमळीत स्थितीतील या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविजेतेपदापर्यंत मजल मारली.

पणजी : ओवेन कॉयल गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीसाठी जादूगर ठरले. डळमळीत स्थितीतील या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. मात्र यंदा चित्र वेगळे असेल. कॉयल जमशेदपूर एफसीच्या डगआऊटमध्ये असतील आणि स्टील नगरीतील संघ त्यांच्यावर विसंबून असेल.

जमशेदपूर एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील आयएसएल सामना मंगळवारी (ता. 24) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. त्यावेळी आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेल्या कॉयल यांच्या व्यूहरचनेवर जास्त झोत असेल, शिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईच्या संघात यशस्वी ठरलेला लिथुआनियाचा आंतरराष्ट्रीय नेरियस व्हॅल्सकिस याच्याकडे जमशेदपूर संघाच्या आक्रमणाचे नेतृत्व असेल. व्हॅल्सकिसने गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 15 गोल नोंदवून गोल्डन बूट पटकाविला होता.

जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयीन एफसी संघ 2019-20 मोसमाच्या सुरवातीस गट्यांगळ्या खात होता. कॉयल यांनी सूत्रे स्वीकारली तेव्हा चेन्नईयीन संघाच्या खाती सहा सामन्यांतून फक्त पाच गुण होते. 54 वर्षीय कॉयल यांनी संघात प्रचंड आत्मविश्वास जागविला आणि चेन्नईतील संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. यंदा अशीच कामगिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरकडून अपेक्षित आहे.

उद्याच्या लढतीविषयी कॉयल यांनी सांगितले, की ‘‘अर्थातच आम्हाला त्यांची ताकद माहीत आहे. पण मला नेहमीच वाटते, की तुम्ही जेव्हा तुमच्या जुन्या संघाविरुद्ध असता, जे खेळाडू यापूर्वी तुमच्या हातीखाली खेळलेले असतात, त्यांना सिद्ध करायचे असते, की ते अजूनही अव्वल खेळाडू आहेत ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी खूपच आदर बाळगून राहू.’’

चेन्नईयीनच्या प्रशिक्षकपदी हंगेरीचा साबा लाझ्लो असून 56 वर्षीय प्रशिक्षक युरोपात यशस्वी ठरले आहेत. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती भरून काढण्याचे आव्हान चेन्नईयीनसमोर असेल. कर्णधार मध्यरक्षक राफेल क्रिव्हेलारो व बचावपटू एली साबिया या ब्राझीलियन खेळाडूंना चेन्नईयीनने संघात राखले असून त्यांच्यावर जास्त मदार राहील. गतमोसमात जमशेदपूरकडून खेळलेला अनुभवी ब्राझीलियन बचावपटू मेमो (एमरसन मौरा) यंदा चेन्नईयीन एफसीचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

दृष्टिक्षेपात...

- चेन्नईयीन एफसी 2 वेळा आयएसएल विजेते (2015 व 2017-18)

- मागील मोसमात चेन्नईयीनचे साखळी फेरीत 8 विजय, चौथे स्थान

- गतमोसमात जमशेदपूर आठव्या स्थानी, 18 लढतीत 4 विजय

- 2019-20 मोसमात चेन्नईयीनचा जमशेदपूरवर 4-1 फरकाने विजय, अन्य लढतीत 1-1 बरोबरी

आणखी वाचा:

 

हैदराबादने चाखली विजयाची चव: आरिदानेच्या पेनल्टी गोलमुळे आयएसएलमध्ये ओडिशाला नमविले

संबंधित बातम्या