पेडे हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय मान्यता

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून जागतिक हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमाणपत्र लाभले आहे.

पणजी : गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून जागतिक हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमाणपत्र लाभले आहे.
गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी हे ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान विकसित करण्यात आले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राज्यातील चार क्रीडा प्रकल्पांसाठी एकूण १९.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी पेडे-म्हापसा हॉकी मैदानासाठी ५.५० कोटी रुपये आहेत. गोव्यातील हे एकमेव ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान आहे. हॉकी इंडियाच्या संदेशानुसार, गोव्यातील पेडे क्रीडा संकुलातील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानास एफआयएचने मान्यतेचे प्रमाणपत्र बहाल करताना ते जागतिक मैदान आवश्यकतेची पूर्तता करत असल्याचे नमूद केले आहे.

जागतिक हॉकी महासंघाच्या शिष्टमंडळाने सप्टेंबरच्या सुरवातीस या हॉकी मैदानाची तपासणी केली होती. काही दिवसांपूर्वी जागतिक महासंघाने पेडे हॉकी मैदानास प्रमाणपत्र दिले असून त्याची वैधता सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल.

अगोदरचे काम निकृष्ट ठरल्यामुळे या मैदानावर दुसऱ्यांदा ॲस्ट्रो टर्फ बसविण्यात आले. मैदान खेळण्यास धोकादायक असल्याचे कारण देत संबंधित संस्थेने त्यास आवश्यक प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. संबंधित कामाचे ठेकेदार आणि ॲस्ट्रो टर्फ पुरवठादारांनी तांत्रिक त्रुटी मान्य करून गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून अतिरिक्त शुल्क न आकारता मैदानावर दुसऱ्यांदा ॲस्ट्रो टर्फ 
बसविले.

हॉकी मैदानाचे पॅव्हेलियन, ड्रेसिंग रुम तयार झाल्यानंतर त्याचे औपचारिक उद्घघाटन होईल. ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानामुळे गोव्यात भविष्यात हॉकी इंडियातर्फे राष्ट्रीय संघाचे शिबिर घेण्याचीही शक्यता आहे, तसेच गोव्यात राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा घेणेही शक्य असेल.

संबंधित बातम्या