आयपीएल २०२०: तीन दिवसांच्याच विलगीकरणासाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया खेळाडूंचे गांगुलींना पत्र

पीटीआय
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आयपीएलच्या महाकुंभात पहिल्यापासून सहभागी होता यावे, यासाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील खेळाडू कमालीचे आग्रही आहेत. अमिरातीतील विलगीकरण सहाऐवजी तीन दिवसांचे करा, अशी मागणी या खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली आहे.

दुबई: आयपीएलच्या महाकुंभात पहिल्यापासून सहभागी होता यावे, यासाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील खेळाडू कमालीचे आग्रही आहेत. अमिरातीतील विलगीकरण सहाऐवजी तीन दिवसांचे करा, अशी मागणी या खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली आहे.

लंडनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. यातील अखेरचा सामना उद्या (१६ सप्टेंबर) होत आहे. या दोन संघातील तब्बल २१ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. अमिरातीत आणण्यासाठी या सर्व खेळाडूंसाठी विशेष विमानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. १७ तारखेला ते लंडनहून प्रयाण करतील; परंतु सहा दिवसांच्या विलगीकरण नियमानुसार १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये काही खेळाडूंना एक ते दोन सामन्यांस मुकावे लागणार आहे. 

हे सर्व खेळाडू पहिल्या लढतीपासून खेळण्यास उत्सुक आहेत. एकाही सामन्यास त्यांना मुकायचे नाही; पण त्यामध्ये विलगीकरणाच्या दिवसांचा अडथळा येत आहे. सहाऐवजी तीन दिवसांचे विलगीकरण करावे, अशी मागणी या खेळाडूंनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे केली आहे. आयपीएलच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गांगुली यांच्यासह आयपीएल प्रशासकीय समिती दुबईत आहे. बीसीसीआय अध्यक्षांना या खेळाडूंकडून करण्यात आलेल्या मागणीचे पत्र मिळाले आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

लंडनमध्ये मालिका खेळत असताना आम्ही अगोदरपासूनच ‘बायो बबल’ चौकटीत आहोत. इंग्लंडचे खेळाडू तर दोन महिन्यांपासून या वातावरणात आहेत. आम्ही ऑस्ट्रेलियात या चौकटीत होतो. आता इंग्लंडमध्ये खेळताना हे नियम पाळत आहोत. त्यामुळे आम्हाला अमिरातीतील विलगीकरणात सुट द्यावी, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू सामने होणाऱ्या साऊदम्टन आणि मॅंचेस्टर येथील हॉटेल हिल्टन येथे राहत आहे, हे हॉटेल स्टेडियमचा भाग आहे. सर्व खेळाडूंची प्रत्येक पाच दिवसांनी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर इंग्लंडहून रवाना होतानाही त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. अमिरातीत दाखल झाल्यावर पहिल्या आणि तिसऱ्या दिवशीही त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यामुळे अमिरातीतील विगलीकरण तीन दिवसांचे करण्यात हरकत नसावी, असाही मुद्दा या पत्रात मांडण्यात आला आहे.

लंडनमधील ‘बायो बबल’ नियम अतिशय कडक होते. हाऊसकिपिंगलाही त्यांचा रूममध्ये प्रवेश नव्हता. हे खेळाडू खासगी विमानाने लंडन ते दुबई प्रवास करणार आहेत. हे विमान संपूर्ण निर्जंतुकही करण्यात येणार आहे. त्यामुळे आमची विनंती मान्य करावी, असे खेळाडूंचे म्हणणे आहे.

राजस्थान रॉयल्सला फटका?
राजस्थान रॉयल्स संघात जोफ्रा आर्चर, जॉस बटलर आणि स्टीव स्मिथ असे तीन खेळाडू आहेत, तर वडिलांच्या आजारपणासाठी बेन स्टोक्‍स न्यूझीलंडला गेलेला आहे तो कधी परतणार, याबाबत काहीच कल्पना नसलेल्या राजस्थानसाठी सलामीच्या सामन्यात हे प्रमुख खेळाडू अनुपलब्ध राहिले, तर त्याचा परिणाम होऊ शकेल.

कोलकता संघावर परिणाम नाही
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया खेळाडू विलगीकरणाचे दिवस कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु सहा दिवसांचे विलगीकरण राहिले, तरी कोलकता संघावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण त्यांचा सलामीचा सामना २३ सप्टेंबर रोजी होत आहे. तसेच या २१ खेळाडूंपैकी एकही खेळाडू मुंबई इंडियन्स संघात नाही. त्यामुळे सहा संघांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

संबंधित बातम्या