आयपीएल २०२०: सुरेश रैनासाठी चेन्नई संघाचे दरवाजे बंदच

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सलग दोन पराभवामुळे संघाच्या पाठीराख्यांनी सुरेश रैनाला संघात परत आणण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली असली तरी त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंदच राहातील, अशी भूमिका संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथन यांनी जाहीर केली.

दुबई:  चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सलग दोन पराभवामुळे संघाच्या पाठीराख्यांनी सुरेश रैनाला संघात परत आणण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली असली तरी त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंदच राहातील, अशी भूमिका संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथन यांनी जाहीर केली.

रैनाने स्वतःहून माघार घेतलेली आहे, त्यामुळे त्याला संघात पुन्हा घेण्याबाबत विचार करणे अशक्‍य आहे, असे विश्‍वनाथन यांनी म्हटले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संघ व्यवस्थापन तयार असेल तर रैना आता संघात परतण्यास उत्सुक आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते, पण आमचा असा कोणताही विचार नसल्याचे संघाच्या सीईओ यांनीच हे स्पष्टीकरण दिले आहे.  चेन्नई संघाचे झालेले सलग दोन पराभव, त्यातच रैनाची जाणवणारी अनुपस्थिती, यामुळे चेन्नईचे पाठीराखे नाराज झाले आहेत, याबाबत विचारले असता विश्‍वनाथन म्हणाले, आमचा संघ निश्‍चितच दमदार पुनरागमन करेल आणि पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागेल, आमच्या संघात इतरही चांगले गुणवान खेळाडू आहेत. हा खेळ आहे, चढउतार होत असतातच, पाठीराख्यांना समाधान देण्यासाठी काय करायला हवे, याची जाण खेळाडूंना आहे.

रायडू तंदुरुस्तीच्या मार्गावर
मुंबईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात निर्णायक खेळी करणाऱ्या अंबाती रायडूची अनुपस्थिती चेन्नई संघाला जाणवत आहे. पहिल्या सामन्यात त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. पुढच्या सामन्यात खेळू शकेल, असाही विश्‍वास विश्‍वनाथन यांनी व्यक्त केला. दिल्लीविरुद्ध खेळल्यानंतर चेन्नई संघाला आता सहा दिवसांची विश्रांती असून त्यांचा पुढचा सामना २ ऑक्‍टोबरला हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या