आयपीएल २०२०: पंजाबच्या आक्रमणाला दिल्लीचे फिरकी अस्त्र

वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

गेल-राहुल-मॅक्‍सवेल विरुद्ध अश्‍विन-मिश्रा-अक्षर, उत्कंठा वाढली

शारजा: ताकदवान आक्रमक फलंदाज विरुद्ध निष्णात फिरकी गोलंदाज अशा पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यात उद्या आयपीएलचा सामना रंगणार आहे. ख्रिस गेल, केएल राहुल आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांचे आक्रमण आर. अश्‍विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे दिल्लीचे फिरकी गोलंदाज कसे थोपवतात यावर सामन्याचे भवितव्य ठरणार आहे.

शारजाच्या मैदानावर होणारा आयपीएलचा हा पहिला सामना असणार आहे. खेळपट्टीचे स्वरूप गुलदस्त्यात असले, तरी तिचा मूळ पिंड फिरकीस साथ देणारा असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच दोन्ही संघांचा पहिलाच सामना असल्यामुळे सुरुवात सावधपणे होईल यात शंका नाही.

पाँटिंग वि. कुंबळे
एकापेक्षा एक सरस खेळाडूंमधला हा सामना मैदानावर खेळला जाईल, पण त्याच वेळी रिकी पाँटिंग आणि अनिल कुंबळे या मात्तबर माजी खेळाडूंची प्रशिक्षक म्हणूनही कसोटी लागणार आहे. पाँटिंग ऑस्ट्रेलिया संघांशी निगडीत राहिलेले आहेत; तर कुंबळे टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक होते, त्यामुळे दोघांकडे प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे.

दिल्लीही कमी नाही
पंजाब संघाकडे आक्रमक शैलीचे फलंदाज असले तरी दिल्लीही त्यात कमी नाही. कर्णधार श्रेयस अय्यर, शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि वेस्ट इंडीजचा शिमरॉन हेटमायर असे मॅचविनर आहेत त्यामुळे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि कितीही मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.

संबंधित बातम्या