आयपीएल २०२०: उष्ण व दमट हवामानात मोठी खेळी करणे कठीण - रोहित शर्मा

वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अमिरातातील उष्ण आणि दमट असलेल्या हवामानात मोठी खेळी करणे कठीण आहे, त्यामुळे कोलकाताविरुद्ध मी ८० धावा करत असताना अधिक दमलो होतो, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

अबुधाबी: अमिरातातील उष्ण आणि दमट असलेल्या हवामानात मोठी खेळी करणे कठीण आहे, त्यामुळे कोलकाताविरुद्ध मी ८० धावा करत असताना अधिक दमलो होतो, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

बुधवारी झालेल्या या सामन्यात रोहितने ५४ चेंडूत ८० धावांची खेळी केली, पण अर्धशतक केल्यानंतर रोहित दुहेरी धावा पळून काढल्यावर मांडीवर बसताना दिसत होता. येथे मोठी खेळी करणे सोपे नाही. येथील आव्हानात्मक हवामानात खेळताना ताकद आणि क्षमता कमी होत जाते, हा सर्वांसाठी धडा आहे. ज्या फलंदाजाचा जम बसेल त्याने अखेरपर्यंत कशी फलंदाजी करायला हवी हे यातून समजते. अमिरातीत असे घडताना याअगोदरही पाहिलेले आहे. कालच्या खेळीत मी दमलो होतो, अशी कबुली रोहितने दिली.

दमट आणि उष्ण वातावरणात फलंदाजी करणे कठीण असले, तरी सहा महिन्यांनंतर मैदानात उतरल्यावर अशी खेळी होणे हे आनंददायी होते, असे सांगून रोहित म्हणाला, गेल्या सहा महिन्यांत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच पहिल्या सामन्यातही लवकर बाद झालो होतो, त्यामुळे सुरुवातीला मी जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर राहण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने माझ्या प्रयत्नांना यश आले. ८० धावांच्या खेळीत रोहितने पूलचे शानदार षटकार मारले. पूलच्या फटक्‍यांचा सढळ वापर करण्याचे मी ठरवले होते. तसा सरावही केला होता. शेवटी संघासाठी माझी खेळी उपयोगी ठरली हे महत्त्वाचे आहे, असे रोहित म्हणाला. 
 

संबंधित बातम्या