शारजा: चेन्नईला नमवून विजयी सलामी देणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा सामना उद्या फॉर्मात आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. आक्रमक सलामीवीर जॉस बटलर उद्याच्या सामन्यात खेळणार आहे. तसे झाल्यास राजस्थानची फलंदाजीतील ताकद अधिकच भक्कम होईल.
राजस्थान आणि पंजाब या दोन्ही संघांची ताकद फलंदाजीत आहे; शिवाय हा सामना आकाराने लहान असलेल्या शारजा मैदानावर होणार आहे. त्यामुळे चौकार आणि षटकारांची आताषबाजी होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या केएल राहुल, मयांक अगरवाल आणि ग्लेन मॅक्सवेल अशा फलंदाजांना रोखण्यासाठी राजस्थानकडे जोफ्रा आर्चर नावाचे अस्त्र आहे; तर पंजाबचे महम्मद शमी आणि शेल्डन कॉड्रेल हे फॉर्मात आलेले वेगवान गोलंदाज आहेत.
बटलर इंग्लंडहून आपल्या कुटुंबासह अमिरातीत आल्यामुळे त्याला सहा दिवसांचे विलगीकरण अनिवार्य होते. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याची उणीव कर्णधार स्टीव स्मिथने शानदार अर्धशतक करून भरून काढली होती. बटलर संघात आल्यावर स्मिथवरची जबाबदारी कमी होईल.
हा सामना जसा दोन्ही संघातील फलंदाजांमधला असेल, तसा गोलंदाजांमध्येही रंगणारा असेल. शमी आणि कॉड्रेल यांनी दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीच्या बंगळूर संघाचे कंबरडे मोडले होते. त्यांचा आत्मविश्वास राजस्थानवर मात करण्यास पुरेसा ठरू शकेल.
केएल राहुलचा फॉर्म्युला
बंगळूरविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने कमाल केली होती. सावध सुरुवातीनंतर त्याने अखेरच्या दोन षटकांत केलेली तंत्रशुद्ध टोलेबाजी सर्वांना प्रभावित करणारी होती. अंधाधुंद टोलेबाजी म्हणजे ट्वेन्टी-२० नाही, हे त्याने दाखवून दिले. तंत्रशुद्ध फटकेबाजीवरही मोठी खेळी करता येते, हे त्याने सिद्ध केले होते. याच फॉर्म्युलाने उद्याही तो फलंदाजी करेल.
राजस्थान वि. पंजाब
(स्पर्धेतील नववी लढत)
आमने सामने
तपशील |
राजस्थान |
पंजाब |
विजय |
१० |
९ |
सर्वोत्तम |
२११ |
२२१ |
नीचांक |
११२ |
१२४ |
- गेल्या तीनही लढतीत पंजाबचा विजय
- स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा विजय
- प्रतिस्पर्ध्यांचे यापूर्वीच्या सामन्यात दोनशेचे संरक्षण
ठिकाण : शारजा क्रिकेट स्टेडियम
- हवामानाचा अंदाज ः वाढत्या तपमानापेक्षाही उकाड्याचे गोलंदाज, तसेच फलंदाजांसमोर कडवे आव्हान. त्यामुळे वॉटर ब्रेक वाढण्याची शक्यता. सामन्याच्यादरम्यान ताशी १९ किमी वेगाने वारे वाहतील. मात्र हे गरम वारे असण्याचीही शक्यता
- खेळपट्टीचा अंदाज ः दुसऱ्या डावात कमी वेगाने चेंडू येण्याची शक्यता त्याचा फिरकी गोलंदाजांना फायदा, तसेच फलंदाजी खडतर. या मैदानावर खेळल्याचा राजस्थानला फायदा होऊ शकेल.
लक्षवेधक
- पंजाबची गोलंदाजी राजस्थानच्या तुलनेत काहीशी सरस
- शारजाची सीमारेषा अन्य स्टेडियमच्या तुलनेत कमी अंतराची. सातत्याचा अभाव असलेले पंजाबचे मध्यमगती गोलंदाज संघाचे प्रश्न वाढवू शकतात.
- महम्मद शमी, रवी बिश्नोई, मुरुगुन अश्विन (निवड झाल्यास मुजीब ऊर रेहमान) स्टीव स्मिथ, संजू सॅमसनला किती रोखतात हे महत्त्वाचे.
- जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थानच्या फलंदाजांची
- ताकद वाढणार
- राहुलला रोखण्याचे राजस्थान गोलंदाजांवर दडपण.