आयपीएल २०२०: पंजाबचा शतकवीर के. एल. राहुलचे बल्ले बल्ले..!

वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

विराट कोहलीच्या बंगळूरचा धुव्वा

दुबई: ‘के. एल. राहुल...कमाल राहुल’ असे समालोचक आकाश चोप्राकडून कौतूकाचे विशेषण नेहमीच मिळणाऱ्या राहुलने जबरदस्त नाबाद शतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. राहुलच्या या खेळीमुळे द्विशतकी धावा उभारणाऱ्या पंजाबने विराट कोहलीच्या बंगळूर संघाचा ९७ धावांनी पराभव करुन पहिला विजय नोंदवला. 

राहुलने आज परिपूर्ण फलंदाजीचा नजराणा सादर केले. साधव सुरुवात...डावाच्या मध्यावर आकार घेणारी फलंदाजी आणि अंतिम क्षणी बेदम टोलेबाजी असे गिअर बदलणाऱ्या राहुलने अवघ्या ६९ चेंडूत १४ चौकारा आणि सात षटकारांची आतषबाजी केली त्यामुळे पंजाबने ३ बाद २०६ धावा केल्या. 

राहुलसह अर्धशतकी सलामीनंतर मयांक अगरवाल बाद झाला त्यानंतर पूरन आणि मॅक्‍सवेल यांनी निराशा केली तरी राहुलने संयम गमावला नाही. १५ व्या षटकापर्यंत त्यांच्या खात्यात १२८ धावाच झाल्या होत्या, परंतु अखेरच्या दोन षटकांत राहुल डेल स्टेन आणि शिवम दुबे यांच्यावर तुटून पडला. शतकच नव्हे तर १३२ धावा त्याने पार केल्या. 

राहुलच्या या टोलेबाजीने खरे तर बंगळूर संघाच्या गोलंदाजांचे खच्चीकरण झाले, परंतु त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवरही झाला. पहिल्या १६ चेंडूत पदिक्कल, जोश फिलिप आणि विराट कोहली तंबूत परतले त्यानंतर ८.२ षटकांत ॲरॉन फिन्च व डिव्हिल्यर्स माघारी फिरले तेव्हा बंगळूर संघाच्या पराभवाची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती. 

दृष्टीक्षेपात

  •     पहिल्या ६ षटकांत ५० धावा दिल्यानंतर तीन षटकांत २०, पण उमेश यादवने टाकलेल्या दहाव्या षटकात २० धावा
  •     १० ते १५ या पाच षटकांत अवघ्या ३६ धावा, त्यानंतरच्या पाच षटकांत ८०, त्यात अखेरच्या २ षटकांत ४९
  •     मॅक्‍सवेलचा अवघड झेल मिड-ऑफला पकडण्यात नेगी अपयशी. गेल्या सामन्यात मॅक्‍सवेल याच प्रकारे बाद; मात्र पुढच्याच षटकात शिवमने मॅक्‍सवेलला टिपले
  •     कोहलीने डीप मिडविकेटला राहुलचा (८३) झेल सोडला. कोहलीला या वेळी चेंडूचा योग्य अंदाजच आला नाही. त्यानंतर कोहली लाँग ऑफला राहुलचा झेल घेण्यात अपयशी
  •     राहुलच्या पहिल्या ५० धावा ३६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह
  •     राहुलच्या त्यानंतरच्या ५० धावा २६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह
  •     पहिल्या १० षटकांत १ बाद ९०, त्यात राहुलच्या ४७. त्यानंतरच्या १० षटकांत ११६, त्यात राहुलच्या ८५
  • संक्षिप्त धावफल ः पंजाब २० षटकांत ३ बाद २०६ (केएल राहुल १३२ -६९ चेंडू, १४ चौकारा, ७ षटकार, अगरवाल २६ -२० चेंडू, ४ चौकार, शिवम दुबे ३३-२) वि. वि. बंगळूर १७ षटकांत सर्वबाद १०९ (फिन्च २०, डिव्हिल्यर्स २८ -१८ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, रवी बिश्‍णोई ३२-३, मुरुगन अश्‍विन २१-३)
     

संबंधित बातम्या