आयपीएल २०२०: हा कसला आघाडीवर राहून लढणारा नेता?

वार्ताहर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

महेंद्रसिंग धोनीवर गौतमची पुन्हा ‘गंभीर’ टीका, ‘ते’ षटकार ‘वैयक्तिक’!

नवी दिल्ली: आयपीएलच्या रूपाने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसू लागलेल्या महेंद्रसिग धोनीची लोकप्रियता वाढत असताना टीम इंडियातील माजी सहकारी गौतम गंभीर मात्र धोनीवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. धोनी कर्णधार म्हणून आघाडीवर राहून लढला नाही, अशा शब्दांत गंभीरने धोनीवर हल्लाबोल केला.

क्रिकेटविश्‍वात आणि भारतीय क्रिकेटमध्येही सर्वजण धोनीचे गोडवे गातात, पण गौतम मात्र वेळोवेळी धोनीवर ‘गंभीर’ टीका करताना दिसून येतो. काल राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा १६ धावांनी पराभव झाला. संघाला गरज असताना धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला, त्यामुळे धोनी स्वतः आघाडीवर राहून लढणारा कर्णधार नाही असे गंभीरने म्हटले आहे.

काय म्हणतो गंभीर...

  •     भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने सॅम करन, पदार्पण करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांना फलंदाजीस पाठवले.
  •     १५ षटकांत धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला तेव्हा चेन्नईला १०० पेक्षा जास्त धावांची गरज होती.
  •     तरीही त्याने आक्रमकता दाखवली नाही.
  •     १२ चेंडूत अवघ्या ९ धावा
  •     १८ व्या षटकात त्याने पहिला षटकार मारला
  •     अंतिम षटकात पराभव झाल्यावर मारलेले षटकार हे त्याला वैयक्तिक धावा देणारे.

संघाला गरज असताना असे कोणी केले असते का?
कर्णधार स्वतः सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो? तो धोनी असल्यामुळे कोणीच बोलत नाही. जेव्हा सुरेश रैनासारखा फलंदाज संघात नसतो, तेव्हा तुम्ही सॅम करन तुमच्यापेक्षा श्रेष्ठ फलंदाज असल्याचे दाखवता. इतकेच नव्हे तर ऋतुराज, केदार, मुरली विजय हे तुमच्यापेक्षा अधिक चांगले फलंदाज असल्याने श्रेष्ठ असल्याचे दर्शवता, अशी कठोर टीका गंभीरने केली.

अतिरिक्त विलगीकरणाचा परिणाम : धोनी
1 दोन आठवड्यांच्या अतिरिक्त विलगीकरणाचा आमच्या सरावावर परिणाम झाला. त्यामुळे फलंदाजीचा दीर्घ सराव करता आला नाही, असे चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. लक्ष्य अवघड असतानाही धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. आयपीएलच्या १२ वर्षांच्या इतिहासात हे केवळ सहाव्यांदा घडले. यासंदर्भात तो म्हणाला, दीर्घकाळ मी फलंदाजीच केलेली नाही. माझा फलंदाजीचा पुरेसा सराव झालेला नाही. १४ दिवसांच्या विलगीकरणाचा परिणाम झाला. स्पर्धेत तसेच स्पर्धात्मक क्रिकेटमध्येही परत येत असताना आपण जास्त घाई करणार नाही असे त्याने सांगितले. धोनीने आपण ४३७ दिवसांनंतर स्पर्धात्मक सामना खेळलो असल्याचे मुंबईच्या सामन्यानंतर सांगितले होते.

2 चेन्नई संघातील १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांचे विलगीकरण वाढवण्यात आले होते. आमची अपेक्षित सुरुवातही झाली नाही हेही त्याने नमूद केले. त्याचबरोबर त्याने सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रयोगांस वाव असतो, ते आम्ही करीत असल्याचेही सांगितले.

हा दरवर्षीचा प्रश्‍न
धोनी जास्त खालच्या क्रमांकावर खेळला का, हा नेहमीचा प्रश्‍न आहे. तो १२ व्या किंवा १४ व्या षटकात आला तर खूप काही साध्य होऊ शकेल; मात्र तो दीर्घकाळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याची सर्वोत्तम कामगिरी होण्यास काहीसा वेळ लागेल. तो काय करू शकतो हे आपण अखेरच्या षटकात पाहिले, याकडे चेन्नईचे मार्गदर्शक स्टीफन फ्लेमिंग यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या