आयपीएल २०२०: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईसाठी आजची लढत सोपी

वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राजस्थानची तारेवरची कसरत

शारजा: अनेक अडचणींचा सामना करून आयपीएलचा पहिला सामना आणि तोही गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा उद्या ‘दुबळ्या’ राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. बेन स्टोक्‍स अद्याप संघात आलेला नाही. त्यातच जोस बटलर आणि कर्णधार स्टीव स्मिथच्या अनुपस्थितीमुळे राजस्थानचा संघ कमजोर झाला आहे.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राजस्थानला आता नवोदित आणि तेही भारतीय खेळाडूंवर भर देऊन उद्या ताकदवर नेता महेंद्रसिंग धोनीचा सामना करावा लागणार आहे. अमिरातीत दाखल होताच दोन खेळाडूंसह ११ सदस्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग, त्यातच हुकमी खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेऊनही धोनीचा संघ सावरला आहे. या तुलनेत सराव चांगला करूनही केवळ प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे राजस्थानला उद्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

का खेळणार नाही स्मिथ, बटलर
इंग्लंडमधील मालिका खेळताना बायो बबल नियमात असल्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अमिरातीत आल्यावर केवळ ३६ तासांचे विलगीकरण करण्यात आले, पण बटलर येथे येताना कुटुंबासोबत आला, त्यामुळे त्याला सहा दिवसांचे विलगीकरण अनिवार्य झाले आहे. इंग्लंडमधील मालिकेत सराव करताना स्मिथच्या डोक्‍याला मार लागला होता. त्या मालिकेत तो खेळला नव्हता. अजूनही तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात येत आहे.
 

संबंधित बातम्या