IPL 2020: मुंबई इंडियन्सकडे सुरक्षेसाठी ‘रिंग’मास्टर

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

शरीरातील प्रत्येक घडामोडींचा ट्रॅक करणारी खास स्मार्ट रिंग वापरणार

अबु धाबी: आयपीएलमध्ये नेहमीच इतरांपेक्षा वेगळे काही तरी प्रयत्न करत असणारे मुंबई इंडियन्स आता कोविड-१९ सुरक्षा चाचणी सर्वांपेक्षा वेगळी करणार आहेत. स्मार्ट रिंग असे या चाचणी दर्शकाचे नाव आहे. संघातील प्रत्येक सदस्य या रिंगचा वापर करेल, त्याद्वारे प्रकृतीचा ट्रॅक या रिंगद्वारे ठेवला जाणार आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध एनबीएमध्ये अशा रिंगचा वापर केला जात आहे.

अमिरातीत होत असलेली आयपीएल अधिक सुरक्षित व्हावी यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक संघासाठी ब्ल्यूटूथ कनेक्‍टिव्हिटी असलेले एक उपकरण दिले आहे. हेल्थ ॲपशी ते जोडले जाणार आहे. मुंबई इंडियन्सने स्मार्ट रिंग आणून एक पाऊल पुढे टाकले आहे, त्यामुळे अतिशय गुप्तपणे शिरकाव करणाऱ्या या विषाणूची वेळीच जाणीव होऊ शकेल.

कशी असणार ही रिंग
ही रिंग हातात घातली की प्रत्येकाच्या प्रकृतीचा महत्त्वाचा डेटा मिळवणार आहे. हृदयाचे ठोके, त्याचे स्मंदन, श्‍वसनाचा वेग, शरीराचे तापमान आणि शरीरातील इतर बदलाच्या घडामोडी या रिंगद्वारे नोंदल्या जाणार आहेत. यामध्ये थोडीही असमानता असली तर ही रिंग लक्षणे नसलेले संदेश देईल, त्यामुळे विषाणूची बाधा व्हायच्या आतच लगेचच त्यावर उपचार सुरू करता येतील, अशी माहिती मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी दिली. एनबीएमध्ये (राष्ट्रीय बास्केटबॉल असोशिएशन) अशा प्रकारची प्रकृतीतील बदल ट्रॅक करणारी रिंग वापरली जात आहे, असेही या सूत्रांनी सांगितले. 

आयपीएल अमिरातीत होणार हे निश्‍चित झाल्यावर प्रत्येक संघांनी आपापली उपाययोजना करण्यास सुरुवात केली, त्याचवेळी मुंबई इंडियन्सने स्वतःची जैव सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली. परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर संघात दाखल होण्यास सांगितले. विलगीकरण केल्यानंतर प्रत्येकाच्या चाचण्या केल्या आणि नवी मुंबईतील त्यांच्या क्रिकेट अकदमीत सराव शिबिरही सुरू केले. त्यानंतर पीपीई किट परिधान करून त्यांचा संघ अमिरातीत दाखल झाला होता. डोक्‍यापासून पायाच्या बोटापर्यंत आम्ही सर्व कव्हर केले होते, असे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या