आयपीएल २०२०: राजस्थानचा ‘हल्ला बोल’ विजय

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

सॅमसन, स्मिथ आणि आर्चरची टोलेबाजी ठरली निर्णायक

शारजा: ‘हल्ला बोल’ अशी आयपीएलमध्ये टॅग लाईन असलेल्या राजस्थान रॉयल्सने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई संघावर अक्षरशः हल्ला बोलच केला, तब्बल १७ षटकार आणि ९ चौकारांची आतषबाजी करत द्विशतकी धावा उभारल्या आणि १६ धावांनी आपला सलामीचा सामना जिंकला.

संजू सॅमसन, स्टीव स्मिथ आणि जोफ्रा आर्चर या तिघा फलंदाजांनी ही वादळी टोलेबाजी केली त्यामुळे राजस्थानने २१६ धावा केल्या. चेन्नईने जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, फाफ डुप्लेसीनेही ३६ चेंडूत ७२ धावांचा घणाघात सादर केला, पण अखेर सरशी राजस्थानचीच झाली. आर्चरने डुप्लेसीला बाद केले आणि त्यानेच फलंदाजी करताना अखेरच्या षटकात फटकावलेल्या ३० धावा सामन्याचा निकाल स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. 

सॅमसन-स्मिथची शतकी भागी
जोस बटलर आणि बेन स्टोक्‍स अशा दिग्गज फलंदाजांच्या अनुपस्थितीत राजस्थानची फलंदाजी कमकूवत वाटत होते, परंतु मैदानात उतरल्यावर त्यांनी यंदाच्या मोसमातील पहिली द्विशतकी धावसंख्या उभारली. संजू सॅमसन सुरुवातीपासून भलत्याच मूडमध्ये होता. नैत्रदीपक षटकांची माळ त्याने ओवळण्यास सुरुवात केली. कर्णधार स्टीव स्मिथलाही लय सापडली त्यानेही तेवढाच आक्रमक हल्ला चेन्नईच्या गोलंदाजांवर चढवला या दोघांनी शतकी भागीदारी केली.

राजस्थान द्विशतकी धावा उभारणार हे निश्‍चित वाटत होते, परंतु सॅमसन आणि स्मिथ बाद झाल्यावर राजस्थानची मधली फळी अपयशी ठरली परंतु, नवव्या क्रमांकाचा फलंदाज जोफ्रा आर्चरने एन्गिडीच्या अखेरच्या षटकांत तब्बल ३० धावांची लयलूट केली. 

संक्षिप्त धावफलक ः राजस्थान ः २० षटकांत ७ बाद २१६ (स्टीव स्मिथ ६९ -४७ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, संजू सॅमसन ७४ -३२ चेंडू, १ चौकार, ९ षटकार, जोफ्रा आर्चर नाबाद २७ -८ चेंडू, ४ षटकार, सॅम करन ३३-३, एन्गिडी ५६-१, चावला ५५-१). चेन्नई ः २० षटकांत ६ बाद २०० ः (शेन वॉटसन ३३ -२१ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, फाफ डुप्लेसी ७२ - ३७ चेंडू, १ चौकार ७ षटकार, सॅम करन १७ -६ चेंडू, १ चौकार, २ षटकार, धोनी नाबाद २९ -१७ चौकार, ३ षटकार, आर्चर २६-१, तेवाटिया ३७-३,)

धोनीचा स्टेडियमच्या बाहेर षटकार
चेन्नईचा पराभव निश्‍चित झालेला असला तरी धोनीने हार स्वीकारली नव्हती त्याने करनच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारले त्यातील एक षटकार तर स्टेडियमच्या बाहेर रस्त्यांवर गेला.
 

संबंधित बातम्या