आयपीएल २०२०: राजस्थान संघासमोर सुरुवातीला अडचणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

स्टीव स्मिथ, आर्चर, बटलर, स्टोक्‍स सलामीला अनुपलब्ध

नवी दिल्ली: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जैव सुरक्षा नियमात खेळवली जात असली तरी आयपीएलसाठी अमिरातीत येणाऱ्या या दोन्ही संघांतील खेळाडूंना विलगीकरणाच्या नियमात सूट मिळणार नाही, याचा पुनरुच्चार करण्यात आला. त्याचा फटका राजस्थान रॉयल्सला बसणार आहे.

आयपीएलचे वेळापत्रक कालच जाहीर करण्यात आले. १९ सप्टेंबरपासून आयपीएल सुरू होत आहे. आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरचा एकदिवस सामना १० सप्टेंबरला संपत आहे. आयपीएलमध्ये खेळणारे या दोन्ही संघातील खेळाडू अमिरातीला आल्यावर त्यांना पूर्णतः विलगीकरण करावे लागेल, त्यानंतर त्यांच्या चाचण्या होतील, त्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना खेळता येणार आहे. परिणामी आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात हे खेळाडू उपलब्ध नसतील.

राजस्थान रॉयल्सला या नियमाचा मोठा फटका बसणार आहे. कर्णधार स्टीव स्मिथसह जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि टॉम करण या खेळाडूंसह सुरुवातीच्या एक-दोन सामन्यांत खेळावे लागेल, त्यातच हुकमी अष्टपैलू बेन स्टोक्‍सबाबत अनिश्‍चितता कायम आहे. न्यूझीलंडमध्ये राहत असलेल्या आणि कर्करोग झालेल्या वडिलांची श्रुशूषा करण्यासाठी स्टोक्‍स न्यूझीलंडमध्ये गेलेला आहे, त्यामुळे त्याने इंग्लंड संघातून माघार घेतलेली आहे.

वेळापत्रकातील सामन्यांनुसार राजस्थान संघाला प्रवासही बराच करावा लागणार आहे. राजस्थान संघाचे होम ग्राऊंड दुबई आहे. येथे ते सहा, अबुधाबी येथे पाच आणि शारजात तीन साखळी सामने खेळणार आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने या तीन शहरांत प्रवास करावा लागणार आहे. राजस्थानचा पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या