आयपीएल आजपासून ‘विराटमय

वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

तब्बल सहा महिन्यांनंतर होणार किंग कोहलीचे मैदानावर ‘दर्शन’

दुबई: भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यातील संघर्षाने आयपीएलचा बार उडला आता ज्याची प्रतीक्षा होती, तो किंग कोहली उद्या मैदानात उतरणार आहे. बंगळूर आणि हैदराबाद या सामन्यात निकालापेक्षा विराट कोहलीच्या दर्शनाची प्रतीक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

आपल्या आक्रमक फटक्‍यांएवढाच सोशल मीडियावरही ॲक्‍टिव असणारा विराट चाहत्यांशी जवळीक साधून असतोच, पण त्याला पुन्हा एकदा खेळताना पाहाण्याची संधी तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार आहे. 

ताकदवर फलंदाज; पण...
बंगळूर संघ आयपीएल सुरू होण्याअगोदर नेहमीच संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीतही असतो, पण प्लेऑफच्या शर्यतीतून अगोदरच बाहेर जातो. यंदा तरी दैव बदलेल अशी अपेक्षाही करत आहे. 

प्रेक्षकांशिवाय विराट
विराट कोहली हा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर प्रेक्षकांना सोबत घेऊन खेळणारा खेळाडू म्हणून क्रिकेटविश्‍वात प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यापासून तो नेहमीच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळलेला आहे. पण अखेरचा देशांतर्गत सामना खेळल्यानंतर तो उद्या प्रथमच प्रेक्षकांशिवाय खेळणार आहे. प्रेक्षक हे त्याच्यासाठी ऊर्जेचा स्रोत असतात, पण उद्या हा स्रोत नसला तरी विराटची आक्रमकता कशी राहाते हे पाहाण्यास सर्व जण उत्सुक आहेत. 

हैदराबादही सज्ज
वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने २०१६ मध्ये विजेतेपद मिळवलेले आहे, पण त्यानंतर त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. वॉर्नर, विल्यमन्सन, भुवनेश्‍वर कुमार, रशिद खान असे जुने खेळाडू कायम असले तरी यंदा नव्या खेळाडूंसह त्यांनी संघ उभारणी केली आहे. 

प्रशिक्षकांमधील लढत
इंग्लंडला विश्‍वविजेतेपद मिळवून देणारे ट्रॅव्हस बेलिस यंदा हैदराबादचे प्रशिक्षक; तर बंगळुरचा ऑस्ट्रेलियाच्या सायमन कॅटीच यांच्यावर विश्‍वास कायम.

ताकद
बंगळूर : विराटसह डिव्हिल्यर्स आणि फॉर्मात असलेला ॲरॉन फिन्च यांच्यावर फलंदाजीची भिस्त. मोईन अली आणि ॲडम झॅम्पा मॅचविनर गोलंदाज
हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत यशस्वी ठरलेला बेअरस्टॉ आणि विलम्यसनवर फलंदाजीची मदार, गोलंदाजी : भुवनेश्‍वर आणि नंबर एकचा अष्टपैलून रशिद खान मॅचविनर.

कमकुवत बाजू :
बंगळूर : डेल स्टेन आणि उमेश यादव अनुभवी गोलंदाज असले तरी वेगवान गोलंदाजी काहीशी कमजोर.
हैदराबाद : वॉर्नरचा हरपलेला सूर आणि मधल्या फळीतील अनिश्‍चितता. 

संबंधित बातम्या