आयपीएल २०२० : सुरेश रैना यूटर्नसाठी प्रयत्नशील

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

श्रीनिवासन वडिलांप्रमाणे; आयपीएल पुनरागमनाचे दिले संकेत

नवी दिल्ली: चेन्नई फ्रॅंचाईसबरोबरच्या आपल्या नात्यात कोणताही दुरावा आलेला नाही. केवळ मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. महेंद्रसिंग धोनी माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, असा खुलासा करत सुरेश रैनाने आयपीएलमध्ये परतण्याचेही संकेत दिले आहेत.

आयपीएलसाठी दुबईत पोहचलेल्या चेन्नई संघातील १३ सदस्यांना एकीकडे कोरोनाची लागण होत असताना अनुभवी खेळाडू सुरेश रैनाने वैयक्तिक कारणामुळे अचानक माघार घेतल्यामुळे तर्कवितर्कांना वेग आला. पठाणकोट येथे रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला करण्यात आला. त्यात एका व्यक्तीची हत्या झाली; तर इतरांना दुखापत झाली होती. हा हल्ला आणि प्रसंग विचार करण्याच्याही पलीकडचा आहे, असे दुःख रैनाने व्यक्त केले होते.

एकीकडे या प्रसंगाची चर्चा होत असताना काही दिवसांनंतर रैनाला दुबईत धोनीप्रमाणे गॅलरी असलेली रूम मिळाली नाही म्हणून त्याने थेट स्पर्धेतून माघार घेतली, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात चेन्नई संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनीही रैनाच्या या वृत्तीवर टीका  केली होती.

रैनाने मायदेशी परतल्यावर आपली बाजू मांडली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ माझ्या कुटुंबासारखा आहे. माहीभाई हा तर माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे. माझ्यात आणि चेन्नई संघात कोणताही वाद नाही, असे रैनाने म्हटले आहे.

वडील रागावू शकतात...
श्रीनिवासन यांनी व्यक्त केलेले मत माझ्यापर्यंत पोहचलले. मी नेमक्‍या कोणत्या कारणावरून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला ते कदाचित त्यांना माहीत नसावे. श्रीनिवासन मला वडिलांसारखे आहेत. त्यांनी माझ्यावर नेहमीच त्यांच्या मुलासारखे प्रेम केले आहे. वडील आपल्या मुलावर रागावू शकतात, त्यात गैर काहीच नाही, असे सांगून रैनाने चेन्नई संघातून आपल्याला अजून चार ते पाच वर्षे खेळायचे असल्याचेही रैनाने सांगितले.

संबंधित बातम्या