आयपीएल २०२०: पंचांचा चुकीचा निर्णय पंजाबच्या मुळावर

पीटीआय
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

‘शॉर्ट रन’ नसतानाही एक धाव कमी केली; पंजाबकडून तक्रार दाखल

दुबई: सुपर ओव्हरमध्ये निकाल लागलेल्या दिल्ली - पंजाब यांच्यातील सामन्यातील हिरो मार्कस स्टाॅयनिस आणि मयांक अगरवाल या खेळाडूंच्या मैदानावरील खेळाचे कौतुक होत असताना दुसरीकडे पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णययावरून रणकंदन माजले आहे. त्यांनी दिलेल्या शॉर्ट रनच्या निर्णयाविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अधिकृत तक्रार केली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला दुसराच सामना कमालीचा रंगला. सातत्याने पारडे वर-खाली होत राहिलेला हा सामना ‘टाय’ झाला. दिल्लीच्या १५७ धावांसमोर पंजाबनेही तेवढ्याच धावा केल्या. त्यामुळे घेण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये रबाडाच्या भेदक गोलंदाजीने दिल्लीचा विजय साकारला.

काय घडले...

१९ व्या षटकांत पंच नितीन मेनन यांनी पंजाबचे फलंदाज मयांक अगरवाल आणि जॉर्डन यांनी धावलेल्या दोन धावांमधील एक धाव कमी केली. जॉर्डनने क्रिजच्या पुढे बॅट नेली नाही, असा समज करून त्यांना एकच धाव दिली. परिणामी ही कमी केलेली धाव पंजाबच्या मुळावर आली. ती धाव कमी केली नसतील, तर सामना टाय झालाच नसता. एक धाव कमी करताना मेनन यांनी टीव्ही पंचांची मदत घ्यायला हवी होती. स्वतः निर्णय दिल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

१३ धावांची होती गरज 
ही एक धाव कमी केल्यामुळे पंजाबला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती; परंतु पहिल्या तीन चेंडूवर अगरवालने १२ धावा केल्यावर पुढच्या तीन चेंडूंत एकही धाव झाली नाही. १९ व्या षटकातील धाव कमी केली नसती, तर पंजाबने तीन चेंडू राखूनच विजय मिळवला असता.

संबंधित बातम्या