आयपीएल २०२०: शॉर्ट रनबाबतचा निर्णय दूरचित्रवाणी पंचांना नाहीच

वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

किंग्ज इलेव्हन पंजाब शॉर्ट रन देण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराजित झाले.

दुबई: किंग्ज इलेव्हन पंजाब शॉर्ट रन देण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराजित झाले. या वेळी दूरचित्रवाणी पंचांनी निर्णय फिरवण्याची गरज होती, असे मत व्यक्त केले जात आहे; मात्र आयपीएल तसेच क्रिकेटच्या नियमावलीनुसार याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारच दूरचित्रवाणी पंचांना नाही.

नितीन मेनन यांनी शॉर्ट रनचा निर्णय दिला, त्या वेळी तो निर्णय फिरवण्याचा अधिकार दूरचित्रवाणी पंच पॉल रॅफेल यांना नव्हता. दूरचित्रवाणी पंच किंवा तिसरे पंच केवळ नो बॉल, धावचीत, यष्टिचीत याबाबत थेट निर्णय देऊ शकतात, तसेच बाद किंवा नाबाद याबाबत दाद मागितल्यास तो निर्णय बदलण्याचा त्यांना आधिकार असतो.

नियम २.१३ नुसार शॉर्ट रन ज्याबाजूला घडली, त्याबाजूचे पंच निर्णय देतील; मात्र गोलंदाजाच्या बाजूस असलेले पंच याबाबतची अंतिम सूचना स्कोअररना करतील आणि त्याची नोंद घेतली जाते. गतवर्षीनो बॉलचा निर्णय न दिल्यामुळे एका सामन्याचा निर्णय फिरला होता, त्यामुळे या वेळी दूरचित्रवाणी पंच याबाबत निर्णय देत आहेत.

एक घटना; दोन कॅमेरे, दोन निर्णय
पंचांऐवजी तंत्रज्ञानाची मदत घेतली असती तर शॉर्ट रनचा निर्णय दिला गेला नसता, असा दावा केला जात आहे, पण खरेच तंत्रज्ञान अचूक निर्णय देते का, अशीही विचारणा होत आहे. दिल्ली-पंजाब लढतीचेच उदाहरण दिले जात आहे. दूरचित्रवाणी पंच पॉल रॅफेल यांनी दिल्ली डावात जॉर्डनने मार्कस स्टोईनिस याला टाकलेला चेंडू नो बॉल ठरवला होता.

अपयशी क्रिकेटपटू ते यशस्वी पंच
शॉर्ट रनचा निर्णय दिल्याने टीकेचे लक्ष्य होत असलेले नितीन मेनन यांचा जूनमध्ये आंतरराष्ट्रीय एलीट पंचांत समावेश करण्यात आला. त्या वेळी ते यात निवड झालेले सर्वांत लहान पंच होते. 

  •  २००६ मध्ये देशांतर्गत स्पर्धेसाठी मध्य प्रदेश संघात स्थान राखण्यात अपयशी
  •  नितीन यांनी वडिलांच्या (नरेंद्र मेनन, माजी आंतरराष्ट्रीय पंच) सल्ल्यानुसार राज्य संघटनेची पंच परीक्षा दिली
  •  नितीन यांनी एका वर्षातच स्पर्धात्मक क्रिकेटचा निरोप घेत भारतीय मंडळाच्या सामन्यात पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली
  •   जून २०२० मध्ये एलीट पंच समितीत निगेल लाँग यांच्याऐवजी समावेश

संबंधित बातम्या