IPL 2021: सुरेश रैना चेन्नईतच, राजस्थानने स्टीव स्मिथला वगळले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

राजस्थान रॉयल्सने गतवेळचा कर्णधार स्टीव स्मिथला आपल्या संघातून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

 

नवी दिल्ली :  चार महिन्यांपूर्वी अमिरातीत झालेली आयपीएल सुरू होण्यापूर्वी सुरेश रैनाच्या अचानक माघारीमुळे गाजली होती. त्याच रैनाला चेन्नईने पुढील आयपीएलसाठी संघात कायम ठेवले आहे; मात्र त्याच वेळेस हरभजन सिंग, पियूष चावला आणि मुरली विजय यांना संघातून दूर करण्यात आले आहे; तर राजस्थान रॉयल्सने गतवेळचा कर्णधार स्टीव स्मिथला आपल्या संघातून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

११ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा उर्वरित खेळाडूंसाठी मिनी लिलाव होणार आहे. त्यासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या आणि ताकदवर असलेल्या चेन्नईला प्रथमच बाद फेरी गाठता आली नाही. सातव्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले होते. 

सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी ऐनवेळी घेतलेली माघार त्यामुळे संघरचना बिघडली असल्याचे सांगण्यात आले होते. रैनाने वैयक्तिक कारणासाठी माघार घेतली असली, तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखा बाल्कनी असलेला रूम आपल्याला संघाच्या हॉटेलमध्ये देण्यात आला नाही, असे कारण पुढे आले होते. 

राष्ट्रीय स्पर्धेतील अपयशाचा मुंबईतील खेळाडूंना फटका

पहिला टप्पा पार पडलेल्या मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धेत सूमार कामगिरीचा मुंबईतील खेळाडूंना आयपीएल रिटेशनमध्ये फटका बसला आहे. बंगळूर संघाने शिवम दुबेला, कोलकाताने सिद्धेश लाड याला तर दिल्लीने तुषार देशपांडेला संघातून वगळले आहे. आता ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात संधी मिळाली नाही तर या खेळाडूंना आयपीएलला मुकावे लागेल.

मुंबई इंडियन्समधून मलिंगा बाहेर

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने माजी हुकमी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला संघातून वगळले आहे. मलिंगासह कुल्टर नाईल, पॅटिन्सन आणि मॅक्लेन्घन यांचेही स्थान कायम ठेवले  नाही. 

धोनीबरोबरची मैत्री
रैनाने अमिरातीतील स्पर्धेत वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती; परंतु तो आमच्या संघरचनेचा महत्त्वाचा घटक आहे, असे चेन्नई संघाकडून सांगण्यात येत आहे; परंतु रैना आणि धोनी हे चांगले मित्र आहेत आणि धोनीच्या शब्दामुळे त्याला संघात कायम ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

श्रीनिवासन यांनी केली होती टीका

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सर्वेसर्वो आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अमितातील स्पर्धेतून रैनाच्या अचानक माघार घेण्याच्या कृतीवर जाहीर टीकाही केली होती. तो पुन्हा यलो जर्सीत दिसणार नाही, असेही संकेत त्यांनी आपल्या मुलाखतीत दिले होते; पण आता सुरेश रैना संघात कायम ठेवण्यात आले आहे.

स्टीव स्मिथला वगळले

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चेंडू कुरतडल्याप्रकरणी एका वर्षाची बंदीस सामोरे गेलेला असतानाही स्टीव स्मिथवर राजस्थान रॉयल्सने विश्‍वास दाखवला होता; पण एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही राजस्थानला तळाच्या स्थानावर रहावे लागले; अखेर राजस्थान संघाचे स्मिथला संघातून दूर करण्याचा निर्णय घेतला. स्मिथऐवजी आता संजू सॅमसनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फिन्च, मॉरिस बाहेर

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळूर संघातही महत्त्वपूर्ण बदल होत आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ॲरॉन फिन्च, ख्रिस मॉरिस, मोईन खान या परदेशी खेळाडूंसह उमेश यादव, यांनाही रिलिज केले आहे. 

हरभजनचा करार संपला

रैनासह माघार घेणाऱ्या हरभजन सिंगचा चेन्नई संघाबरोबर असलेला करार संपुष्टात आला. त्यामुळे तो पुन्हा वाढवण्यात आला नाही. चेन्नई संघाचे सदस्य नसणार, याला हरभजननेही दुजोरा दिला आहे

संबंधित बातम्या