दुबई: संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनावरची लस बाजारात येईल तेव्हा येईल; पण गेल्या सहा-सात महिने क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या प्रामुख्याने भारतीय क्रिकेटरसिकांना आयपीएलची लस उद्यापासून मिळणार आहे. यासाठी भारताबरोबर क्रिकेटविश्वही सज्ज झाले आहे. इंग्लंडमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतले असले, तरी आयपीएल कोरोनानंतरच्या क्रिकेटसाठी दिशादर्शक ठरणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याने बार उडणार आहे.
कोरोनाचा विळखा बसू लागल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या या आयपीएलने प्रसंगी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला ‘दूर’ करून स्वतःच्या अस्तित्वाचा कालावधी तयार केला. भारत नाही, तर अमिराती... प्रेक्षक नाही तर रिकामी स्टेडियम; पण अनेक आव्हाने पार करत आयपीएल पुन्हा एकदा क्रिकेटच्या प्रेक्षकांवर मोहिनी टाकण्यास सज्ज झाली आहे.
आठ संघ, १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर ५३ दिवस, ६० सामने, तीन स्टेडियम, क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असे स्वरूप असलेली ही आयपीएल फारच वेगळी असणार आहे. एरवी मैदानावरील खेळाडूंच्या संघर्षाला मिळणारा... प्रेक्षकांचा गलका, डीजेचा ताल आणि चिअर लिडर्सचे नृत्य... हा मसाला यंदा नसल्यामुळे आयपीएल कशी असेल, याचे उत्तर उद्यापासून मिळणार आहे.
प्रेक्षकांना संधी मिळणार?
सध्या तरी प्रेक्षकांविना आयपीएलचे सामने होणार आहेत. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण ‘नाकेबंदी’ करण्यात आलेली आहे. दर पाच दिवसांनी प्रत्येकाच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे; पण परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम टप्प्यात काही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये संधी दिली जाण्याचा विचार केला जात आहे.
मुंबई वि. चेन्नई
मुंबई आणि चेन्नई हे आयपीएलमधील बलाढ्य संघ राहिलेले आहेत. मुंबईने चार; तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवलेले आहे. आत्तापर्यंत या दोघांमध्ये २८ सामने झाले असून मुंबईने सर्वाधिक १७ विजय मिळवलेले आहे. चेन्नईची २०८ सर्वाधिक; तर ७९ ही निच्चांकी धावसंख्या राहिलेली आहे; तर चेन्नईविरुद्ध मुंबईने सर्वाधिक २०२ आणि कमीत कमी १४१ धावा केलेल्या आहेत.
सहा महिन्यांनंतर....
जवळपास सहा महिन्यांनंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. न्यूझीलंडमधील कसोटी सामना २ मार्च रोजी संपला होता. त्यानंतर काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धरमशाला येथे मर्यादित षटकांचा सामना होणार होता; परंतु पावसामुळे तो रद्द झाला आणि पुढे मालिकाच रद्द करण्यात आली होती.
महेंद्रसिंग धोनीवर लक्ष
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा महेंद्रसिंग धोनी १० जुलैनंतर क्रिकेटपासून दूर राहिलेला आहे. तब्बल वर्षभरानंतर त्याला पुन्हा खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना उद्यापासून मिळणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात धोनीवर सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे.
संपादन: ओंकार जोशी