आयपीएल२०२०: दोन पराभूत संघांमध्ये आज वर्चस्वाचा सामना; कोलकाता-हैदराबादमध्ये कोणाची बाजी?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

संथ खेळपट्ट्या आणि दमट हवामान यामुळे सामन्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सुरुवातीपासून टोलेबाजी करण्यापेक्षा विकेट हातात ठेवून अंतिम क्षणी प्रहार करण्याचे डावपेच यशस्वी होत आहेत.

अबुधाबी: आयपीएलच्या या हंगामात आठपैकी सहा संघांनी आपल्या पुढे विजयाच्या गुणाची नोंद केली आहे, मात्र कोलकता आणि हैदराबाद या दोन पराभूत संघांचा उद्या सामना होत आहे. जो जिंकेल त्याचे खाते उघडेल. मात्र पराभूत संघाची पाटी कोरीच राहाणार आहे.

कोलकताचा मुंबई इंडियन्सकडून तर हैदराबादचा बंगळूरकडून पराभव झालेला आहे. कोलकताचा संघ समतोल असून संभाव्य विजेत्यांमध्ये त्यांना नेहमीच स्थान दिले जाते, एकापेक्षा एक सरस फलंदाज त्यांच्याकडे असले तरी मुंबईविरुद्ध मात्र त्यांची मात्रा चालत नाही. उद्या हैदराबादविरुद्ध विजयाचा श्रीगणेशा करण्याची त्यांना चांगली संधी आहे. 

संथ खेळपट्ट्या आणि दमट हवामान यामुळे सामन्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सुरुवातीपासून टोलेबाजी करण्यापेक्षा विकेट हातात ठेवून अंतिम क्षणी प्रहार करण्याचे डावपेच यशस्वी होत आहेत. शिवाय अबुधाबी येथील मैदान मोठे आहे, तसेच स्टेडियम खुले असल्यामुळे सायंकाळी हवाही सुटत असते, या सर्व बाबींचा विचार करून रणनिती तयार करणे महत्त्वाचे ठरते. याच मैदानात मुंबईकडून पराभूत झाल्यामुळे कोलकताला धडे मिळाले आहेत.

हैदराबाद संघाला बंगळूरविरुद्ध विजयाची चांगली संधी होती; परंतु बेअरस्टॉ निर्णायक क्षणी बाद झाला आणि सामन्याचे चित्र पालटले, त्यातच मिशेल मार्श जखमी झालेला असल्यामुळे तो व्यवस्थित फलंदाजी करू शकत नव्हता. तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे, त्याच्याऐवजी जेसन होल्डर काही दिवसांनंतर उपलब्ध होऊ शकेल, परंतु उद्याच्या सामन्यासाठी हैदराबादकडे केन विल्यमसनसारखा पर्याय उपलब्ध असेल. मात्र कर्णधार डेव्हिव वॉर्नरला जबाबदारी घ्यावी लागेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या