इराणी फुटबॉलपटू गोव्यात खेळणार?

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

इराणचा व्यावसायिक फुटबॉलपटू हादी महंमदी याच्या संपर्कात एफसी गोवा संघ असून २९ वर्षीय बचावपटू इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळण्याचे संकेत आहेत.

पणजी: इराणचा व्यावसायिक फुटबॉलपटू हादी महंमदी याच्या संपर्कात एफसी गोवा संघ असून २९ वर्षीय बचावपटू इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळण्याचे संकेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एफसी गोवा आणि महंमदी यांच्यातील कराराची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. आयएसएल नियमानुसार तो आशियाई खेळाडूच्या कोट्यातून इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड संघातर्फे खेळेल. सेंटर-बॅक जागी खेळणाऱ्या या खेळाडूमुळे एफसी गोवाच्या बचावफळीस अधिक मजबूती येण्याची चिन्हे आहेत. सर्व प्रकारच्या फुटबॉलमध्ये महंमदी १६० सामने खेळला आहे.
 
बचावफळीतील योगदानासह त्याने गोल करण्याचेही कसब प्रदर्शित केले आहे. त्याच्या नावावर आठ गोल व चार असिस्टची नोंद आहे. त्याने दमाश गिलान एफसी, झोब अहान एस्फाहन व ट्रॅक्टर एफसी या संघांचे यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे.

एफसी गोवाच्या संघात आगामी मोसमासाठी आतापर्यंत चार स्पॅनिश खेळाडूंशी करार केलेला आहे. यामध्ये एदू बेदिया, जॉर्ज ऑर्टिझ, इगोर आंगुलो व इव्हान गोन्झालेझ यांचा समावेश आहे. बेदियावगळता बाकी तिघेही प्रथमच एफसी गोवाकडून खेळतील. फ्रेंच-मोरोक्कन फुटबॉलपटू ह्युगो बुमूस याला करारातून मुक्त केल्याचे एफसी गोवाने अजून जाहीर केलेले नाही. 

संबंधित बातम्या