ईशान, निहाल यांना गोव्याच्या टी-२० क्रिकेट संघात संधी ; 'अमित वर्मा'च्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी निवड

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

गतमोसमातील गोव्याच्या २३ वर्षांखालील संघातून खेळताना चमकदार कामगिरी केलेल्या ईशान गडेकर व निहाल सुर्लकर यांना गोव्याच्या टी-२० क्रिकेट संघात संधी मिळाली आहे.

पणजी : गतमोसमातील गोव्याच्या २३ वर्षांखालील संघातून खेळताना चमकदार कामगिरी केलेल्या ईशान गडेकर व निहाल सुर्लकर यांना गोव्याच्या टी-२० क्रिकेट संघात संधी मिळाली आहे. अष्टपैलू अमित वर्मा याच्या नेतृत्वाखाली आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी वीस सदस्यीय चमू गोवा क्रिकेट असोसिएशनने शनिवारी निवडला. गोव्याचा संघ एक जानेवारीस मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रवाना होईल. तेथे एलिट ड गटातील सामने होणार असून गोव्याचे मध्य प्रदेश, सेनादल, सौराष्ट्र, राजस्थान व विदर्भविरुद्ध सामने १० ते १८ जानेवारी या कालावधीत होतील. गोव्याचा संघ स्पर्धेच्या जैवसुरक्षा वातावरणात दोन जानेवारीस प्रवेश करेल, त्यानंतर सर्व खेळाडूंच्या तीन कोविड चाचण्या होतील.

कोविड-१९ मुळे प्रत्येक संघाला वीस खेळाडू निवडण्याची मुभा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली आहे. गतमोसमातील गोव्याचा रणजी संघ कर्णधार कर्नाटकचा अमित वर्मा याच्याकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. त्याच्यासह मुंबईचा यष्टिरक्षक एकनाथ केरकर व बंगालचा आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा संघातील पाहुणे क्रिकेटपटू आहेत. दिल्लीचा फलंदाज आदित्य कौशिक यंदा संघात स्थानिक खेळाडू असेल. लेगस्पिनर-फलंदाज विश्वंबर काहलोन यालाही झटपट क्रिकेटसाठी संधी देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर अष्टपैलू अमोघ देसाईने संघात पुनरागमन केले आहे.
 

संबंधित बातम्या