ISL 2020-21: एटीके मोहन बागानची नजर अग्रस्थानावर जमशेदपूरविरुद्ध लढत; नॉर्थईस्टला ओडिशाविरुद्ध विजय आवश्यक

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीनंतर आता एटीके मोहन बागानही सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे.

पणजी : मुंबई सिटीनंतर आता एटीके मोहन बागानही सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे. रविवारी  पूर्ण गुणांसह अग्रस्थान मिळविण्यासाठी ते इच्छुक असतील, प्ले-ऑफ फेरीची संधी असल्याने प्रतिस्पर्धी जमशेदपूर एफसीही विजयासाठी प्रयत्नशील असेल. रविवारच्या डबल हेडर लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडसाठी प्ले-ऑफचा दावा भक्कम करण्याकरता ओडिशा एफसीविरुद्ध विजय नोंदविणे अत्यावश्यक असेल. हा सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एटीके मोहन बागान व जमशेदपूर यांच्यात लढत होईल.

मुंबई सिटी (34 गुण) आणि एटीके मोहन बागानची (33 गुण) प्ले-ऑफ फेरी निश्चित झाली आहे. अन्य दोन जागांसाठी हैदराबाद एफसी (24 गुण), एफसी गोवा (23 गुण), नॉर्थईस्ट युनायटेड (23 गुण) यांचा दावा आहे. याशिवाय जमशेदपूर (21 गुण), बंगळूर एफसी (19 गुण) यांनाही संधी असून त्यांचे प्रत्येकी तीन सामने बाकी आहेत.

ISL 2020-21 एफसी गोवासाठी नव्वद मिनिटे महत्त्वाची सलग नऊ सामने अपराजित संघाची...

प्ले-ऑफ फेरी निश्चित झाल्यानंतर अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मुंबई सिटीला मागे टाकून गुणतक्त्यात पहिल्या स्थानाच्या दृष्टीने बाकी चार सामन्यांना महत्त्व देईल. कोलकात्याच्या या संघाने मागील सलग तीन सामने जिंकले आहेत. रविवारी पुन्हा पूर्ण तीन गुण मिळाल्यास एटीके मोहन बागान मुंबई सिटीला दोन गुणांनी मागे टाकेल, तर जमशेदपूर प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. पहिल्या टप्प्यात जमशेदपूरकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे एटीके मोहन बागान संघ सावधच असेल.

नॉर्थईस्ट सहा सामने अपराजित

अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षणीय खेळ केलेला नॉर्थईस्ट युनायटेड संघ सध्या सहा सामने अपराजित आहे, त्यात तीन विजय व तीन बरोबरीचा समावेश आहे. रविवारचे त्यांचे प्रतिस्पर्धी ओडिशा एफसी फक्त नऊ गुणांसह शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहे. हा संघ सलग सात सामने विजयाविना असला, तर नॉर्थईस्टला निश्चिंत राहता येणार नाही. ओडिशाने मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला पिछाडीवरून 2-2 गोलबरोबरीत रोखले होते.

तो गोल डेव्हिड ग्रांडे याचा...

जमशेदपूर एफसीने मागील लढतीत (10 फेब्रुवारी) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीला एका गोलने हरविले होते. त्या सामन्यातील एकमेव गोल 90व्या मिनिटास चेन्नईयीनच्या एनेस सिपोविच याच्या नावे स्वयंगोल नोंदीत झाला होता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नियुक्त केलेल्या सामन्याधिकाऱ्यांनी सामन्याची चित्रफित पाहून निर्णयात शनिवारी दुरुस्ती केली असून तो गोल जमशेदपूरचा स्पॅनिश आघाडीपटू डेव्हिड ग्राँडे याला बहाल केला आहे.

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानचा फिजीयन आघाडीपटू रॉय कृष्णा याचे 16 सामन्यांत सर्वाधिक 12 गोल

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या 16 लढतीत 9 क्लीन शीट्स

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे जमशेदपूर एफसीचा एटीके मोहन बागानवर 2-1 फरकाने विजय

- ओडिशा एफसीच्या ब्राझीलियन दिएगो मॉरिसियोचे 16 सामन्यांत 9 गोल

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे ओडिशाची नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 2-2 गोलबरोबरी

 

संबंधित बातम्या