ISL 2020 21: एटीके मोहन बागानच्या मनवीर, कृष्णाचा धडाका; दुसऱ्या क्रमांकावर कायम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

मनवीर सिंग आणि फिजी देशाचा रॉय कृष्णा यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागानने तळाच्या ओडिशा एफसीचा 4-1 फरकाने धुव्वा उडविला.

पणजी :  मनवीर सिंग आणि फिजी देशाचा रॉय कृष्णा यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागानने तळाच्या ओडिशा एफसीचा 4-1 फरकाने धुव्वा उडविला. सामना शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. मनवीर सिंगने एटीके मोहन बागानचे पहिले दोन्ही गोल केले. दोन्ही वेळेस त्याला रॉय कृष्णा याच्या असिस्टला लाभ मिळाला. मनवीरने पहिला गोल 11व्या, तर दुसरा गोल 54व्या मिनिटास केला.

INDvsENG : टीम इंडियाच्या या दोन गोलंदाजांमध्ये ऑल इज नॉट वेल?

रॉय कृष्णाने तीन मिनिटांत दोन गोल करून यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक अकरा गोल नोंदविण्याचा लाभ मिळविला. मनवीर आणि कृष्णा यांनी आघाडीफळीत सुरेख ताळमेळ साधत ओडिशाच्या बचावफळीवर कायम दबाव टाकला. ओडिशाचा कर्णधार कोल अलेक्झांडर याच्या हाताला पेनल्टी क्षेत्रात चेंडू लागल्यानंतर मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर कृष्णाने 83व्या मिनिटास गोलरक्षक अर्शदीप सिंगला चकवत अचूक नेम साधला. नंतर 86व्या मिनिटास त्याने पुन्हा ओडिशाच्या बचावफळीत गुंगारा दिला. ओडिशा एफसीचा एकमात्र गोल दक्षिण आफ्रिकेच्या कोल अलेक्झांडर 45+1व्या मिनिटास केला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते.

INDvsENG : दुसरा दिवस जो रूटच्या नावावर; इग्लंडची शानदार खेळी

अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानचा हा 15 लढतीतील नववा विजय ठरला. त्यांचे 30 गुणांसह द्वितीय स्थान भक्कम झाले आहेत. पहिल्या क्रमांकावरील मुंबई सिटीपेक्षा आता कोलकात्यातील संघाचे तीन गुण कमी आहेत. स्पर्धेतील नवव्या पराभवामुळे ओडिशा एफसी साखळी फेरीतच गारद होणार हे निश्चित झाले. 15 लढतीनंतर त्यांचे आठ गुण कायम असून अकराव्या क्रमांकात फरक पडलेला नाही.

हैदराबाद नॉर्थईस्टचे `मिशन टॉप फोर`

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानच्या मनवीर सिंगचे यंदा लढतीत 4 गोल

- एकंदरीत 62 आयएसएल लढतीत मनवीरचे 7 गोल

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे यंदा सर्वाधिक 11 गोल, पेनल्टीवर 3

- आयएसएलमध्ये कृष्णाचे 36 लढतीत 26 गोल, ओडिशाविरुद्ध 6

- ओडिशाच्या कोल अलेक्झांडर याचे 13 लढतीत 3 गोल

- पहिल्या टप्प्यातही एटीके मोहन बागानची ओडिशावर 1-0 फरकाने मात

- ओडिशावर यंदा स्पर्धेत सर्वाधिक 9 पराभवांची नामुष्की

संबंधित बातम्या