क्लेव्हिनच्या हॅटट्रिकमुळे चर्चिल ब्रदर्सचा धडाका ; आय-लीग फुटबॉल स्पर्धेत इंडियन ॲरोजवर 5-2 फरकाने चमकदार विजय

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

होंडुरासचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा बर्नांडेझ याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने रविवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत धडाकेबाज विजयी सलामी दिली.

पणजी :  होंडुरासचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा बर्नांडेझ याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने रविवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत धडाकेबाज विजयी सलामी दिली. पूर्वार्धात पिछाडीवर राहिल्यानंतर त्यांनी जोरदार उसळी घेत युवा फुटबॉलपटूंच्या इंडियन ॲरोज संघावर 5-2 असा चमकदार विजय संपादन केला. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला.

आय-लीग स्पर्धा दोन वेळा जिंकलेल्या गोव्यातील संघासाठी क्लेव्हिनच्या तीन गोलव्यतिरिक्त स्लोव्हाकियन लुका मेसेन याने दोन गोल केले. मेसेन याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. नंतर नवव्या मिनिटास वनलालरुआतफेला थ्लाचेऊ याने ॲरोजला बरोबरी साधून दिली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या विकसनशील संघाला 21व्या मिनिटास गुरकिरत सिंग याने पेनल्टी फटक्यावर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चर्चिल ब्रदर्सने जबरदस्त खेळ केला. बर्नांडेझने 35व्या मिनिटास गोल केल्यामुळे दोन्ही संघ विश्रांतीला 2-2 असे गोलबरोबरीत होते. उत्तरार्धात क्लेव्हिन याने अनुक्रमे 58 व 69व्या, तर मेसेन याने 75व्या मिनिटास गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मेसेन याचा हेडर सुरवातीसच भेदक ठरला. पिछाडीनंतर युवा खेळाडूंनी नेटाने खेळ केला. त्यात त्यांना बरोबरी साधणे शक्य झाले. चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूने ॲरोजच्या खेळाडूस पाडल्यानंतर गुरकिरत याने अचूक पेनल्टी फटका मारताना चूक केली नाही. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना 14 जानेवारीस मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध होईल. त्याचदिवशी इंडियन ॲरोज सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध खेळेल.

 

तुर्सुनोवचा सर्वांत वेगवान गोल

कोलकाता येथील मोहन बागान मैदानावर झालेल्या लढतीत रविवारी आय-लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत वेगवान गोलची नोंद झाली. मणिपूरच्या टिड्डिम रोड एथलेटिक असोसिएशनचा (ट्राऊ) ताजिकीस्तानचा खेळाडू कोमरोन तुर्सुनोव याने रियल काश्मीरविरुद्ध नवव्या सेकंदास गोल केला. 2018-19 मोसमात कात्सुमी युसा याने आय-लीग स्पर्धेत 13व्या सेकंदास गोल केला होता, तो विक्रम आज तुर्सुनोव याने मोडला, मात्र त्याच्या गोलमुळे ट्राऊ संघ विजय नोंदवू शकला नाही. 70व्या मिनिटास मेसन रॉबर्टसन याने केलेल्या गोलमुळे आयएफए शिल्ड विजेत्या रियल काश्मीर संघाने सामना 1-1 गोलबरोबरीत राखला.

संबंधित बातम्या