स्टेनमनमुळे ईस्ट बंगालचा दबदबा ; गतविजेत्या बंगळूरवर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

सामन्याच्या पूर्वार्धात मॅटी स्टेनमन याने केलेल्या प्रेक्षणीय गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत काल कोलकात्याच्या ईस्ट बंगालने दबदबा राखला.

पणजी :  सामन्याच्या पूर्वार्धात मॅटी स्टेनमन याने केलेल्या प्रेक्षणीय गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत काल कोलकात्याच्या ईस्ट बंगालने दबदबा राखला. त्यांनी प्रशिक्षक बदललेल्या बंगळूर एफसीवर 1-0 फरकाने मात केली. माजी विजेत्यांवर स्पर्धेत सलग चौथ्या पराभवाची नामुष्की आली.

सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. जर्मन मध्यरक्षक मॅटी स्टेनमन याने ईस्ट बंगालसाठी 20व्या मिनिटास गोल केला, त्यामुळे कोलकात्याच्या संघाने मोसमात केवळ दुसऱ्यांदा सामन्यात पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

ईस्ट बंगालचे दुसऱ्या विजयासह आता 10 लढतीतून 10 गुण झाले आहेत. ते नवव्या क्रमांकावर कायम आहेत. संघाचे नवे अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शना खेळणाऱ्या बंगळूरचे नशीब काही पालटले नाही, त्यामुळे सलग चौथ्या पराभवासह 10 लढतीनंतर त्यांचे 12 गुण कायम राहिले. त्यांच्या सहाव्या क्रमांकात फरक पडलेला नाही.

देबजित मजुमदारचे दक्ष गोलरक्षणही ईस्ट बंगालसाठी फायदेशीर ठरले. विश्रांतीनंतर देबजितने सुनील छेत्रीस यशस्वी ठरू दिले नाही, त्यामुळे बंगळूरला बरोबरीची संधी साधता आली नाही. ईस्ट बंगालच्या बचावफळीने कडक पहारा राखला, त्यामुळे स्पर्धेत दुसऱ्यांदाच त्यांच्यावर गोल झाला नाही. स्पर्धेतील दोन यलो कार्डमुळे मुख्य प्रशिक्षक रॉबी फावलर निलंबित असूनही ईस्ट बंगालने अपराजित मालिका पाचव्या लढतीतही कायम राखली. फावलर यांनी सामना स्टँडमधून पाहिला.

मॅटी स्टेनमन याच्या शानदार गोलमुळे विसाव्या मिनिटास ईस्ट बंगालने आघाडी घेतली. नारायण दासने मैदानाच्या डाव्या बाजूतून दिलेल्या क्रॉस पासवर स्टेनमनने वेगवान चालीवर तिरक्या पायाने चेंडूला नेटची दिशा दाखविली. यावेळी बंगळूरच्या बचावपटूंना, तसेच गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू यांना फटक्याचा अजिबात अंदाज आला नाही. चेन्नईयीनविरुद्ध दोन गोल केलेल्या स्टेनमनचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.

बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने शेवटची दहा मिनिटे बाकी असताना ब्राईट एनोबाखारे याचा फटका अडविताना अफलातून चपळाई दाखविल्यामुळे ईस्ट बंगालची आघाडी एका गोलपुरतीच मर्यादित राहिली. पाच मिनिटे असताना ईस्ट बंगालचा कर्णधार डॅनी फॉक्स याच्या सावधानतेमुळे एरिक पार्तालू बंगळूरला बरोबरी साधून देऊ शकला नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- मॅटी स्टेनमन याचे यंदाच्या आयएसएलमध्ये 3 गोल

- आयएसएलच्या इतिहासात प्रथमच बंगळूरचे सलग 4 पराभव

- ईस्ट बंगाल सलग 5 सामने अपराजित, 2 विजय, 3 बरोबरी

- ईस्ट बंगालचे ओळीने 6 लढतीत 10 गोल

 

संबंधित बातम्या