ISL 2020-21: ब्रँडनवर एफसी गोवाचा विश्वास

ISL 2020 21 FC Goa believes in Brandon
ISL 2020 21 FC Goa believes in Brandon

पणजी: अनुभवी गोमंतकीय मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस याच्यावर एफसी गोवाने आणखी तीन वर्षांसाठी विश्वास दाखविला आहे. नव्या करारानुसार  26 वर्षीय खेळाडू आता जून 2024 पर्यंत या संघात असेल.

एफसी गोवा संघात ब्रँडन 2017 साली दाखल झाला होता, तेव्हापासून तो माजी सुपर कप विजेत्या संघाच्या मध्यफळीत हुकमी खेळाडू ठरला. 2019-20 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविलेल्या एफसी गोवासाठी ब्रँडनने चार मोसमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कालावधीत त्याने भारताच्या राष्ट्रीय संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले. भारताने विश्वकरंडक पात्रता फेरीत नोंदविलेले तिन्ही गोल ब्रँडनच्या असिस्टवरील आहेत. (ISL 2020 21 FC Goa believes in Brandon)

एफसी गोवातर्फे खेळताना ब्रँडन 10 क्रमांकाची जर्सी वापरतो. आयएसएल स्पर्धेत भारतीय खेळाडूतर्फे सर्वाधिक असिस्ट नोंदविण्याचा विक्रम ब्रँडनच्या नावे आहे. एफसी गोवा संघाने 2019 मध्ये सुपर कप जिंकला. त्यांचा तो पहिलाच करंडक होता. त्यावेळी अंतिम लढतीत ब्रँडनचा गोल निर्णायक ठरला होता. ब्रँडन 2020-21 मोसमात एफसी गोवातर्फे 12 सामने खेळला, दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले, मात्र एएफसी चँपियन्स लीगसाठी तो सज्ज झाला आहे.

`एफसी गोवाकडून खेळणे खास`

एफसी गोवाच्या नव्या करारपत्रावर सही केल्यानंतर ब्रँडनने सांगितले, की ``चार वर्षांपूर्वी एफसी गोवाशी करार केल्यापासून या संघाकडून खेळणे माझ्यासाठी खास ठरले आहे. याठिकाणी मला घरचे वातावरण अनुभवायला मिळते. मागील काही वर्षांत आम्ही एकत्रितपणे पुष्कळ यश मिळवू शकलो आणि यापुढेही येत्या काही वर्षांत हीच मालिका कायम राखण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मला खात्री आहे, माझे वैयक्तिक आणि क्लबचे चांगले दिवस येणे बाकी आहे आणि त्यादृष्टीने मेहनत घेण्यास मी सुरवात केली आहे. गोमंतकीय असल्याने या संघाचे शर्ट घालणे कायम राखताना आणि आपल्या लोकांचे यापुढेही प्रतिनिधित्व करताना मला फार आनंद वाटत आहे.``

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी ब्रँडनने करार वाढविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ब्रँडनने भविष्यासाठी एफसी गोवाची निवड केल्याबद्दल रवी यांनी क्लबतर्फे आनंद व्यक्त केला.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com