ISL 2020-21: एफसी गोवास बचावाची चिंता; तळाच्या ओडिशाविरुद्ध चुकांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर

ISL 2020-21: एफसी गोवास बचावाची चिंता; तळाच्या ओडिशाविरुद्ध चुकांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर
ISL 2020-21 FC Goa defense concerns Emphasis on avoiding repetition of mistakes against Lower Odisha

पणजी : एफसी गोवा संघाची बचावफळी चुका करत असल्याचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो मान्य करतात, त्याचवेळी ओडिशा एफसीविरुद्धच्या पुढील लढतीत चुकांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर असल्याचे त्यांनी मंगळवारी नमूद केले. सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवासाठी ओडिशाविरुद्धचा सामना प्ले-ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी सामना खेळला जाईल. सध्या एफसी गोवाचे 17 लढतीतून 24 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत, तर फक्त एक सामना जिंकलेल्या ओडिशाचे 17 सामन्यानंतर फक्त नऊ गुण असून ते शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहेत. ``बाकी सर्व सामन्यांत आमचे लक्ष्य निश्चितच तीन गुणांचे आहे. दबाव असला, तरी खेळाडूंना भावनेस आवर घालून कामगिरी करावी लागेल,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक म्हणाले.

कमजोर बचाव...

`बचावफळीतील चुका चिंता करण्याजोग्या आहेत. सरावात त्या सुधारण्यावर भर देण्यात आलेला आहे. पुन्हा त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष पुरविण्यात आले आहे,`` असे फेरांडो सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले. एफसी गोवाने स्पर्धेत 26 गोल करून या यादीत दुसरा क्रमांक मिळविला आहे, त्याचवेळी त्यांनी 21 गोल स्वीकारले आहेत. ही बाब फेरांडो यांना सलत आहे. मागील सहा सामन्यांत त्यांना क्लीन शीट राखता आलेली नाही. ``संघाला सेटपिसेसवर गोल न स्वीकारण्याबाबत दक्ष राहावे लागेल,`` असे स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले.

ओडिशा एफसीचाही बचाव खूप कमजोर आहे. त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक 30 गोल स्वीकारले आहेत, तसेच सर्वाधिक 10 पराभवांची नामुष्कीही त्यांच्यावर आलेली आहे. साहजिकच एफसी गोवाने गोल धडाका राखल्यास विजयाच्या बाबतीत त्यांचे पारडे जड राहील. मागील तीन सामन्यांत ओडिशाने नऊ गोल स्वीकारले आहेत.

सामना खडतरच

ओडिशा एफसी शेवटच्या क्रमांकावर असले, तरी एफसी गोवासाठी त्यांच्याविरुद्धचा सामना खडतर असेल, अशी सावध प्रतिक्रिया फेरांडो यांनी दिली. ``आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्यावर अजिबात दबाव नसेल, त्यांचे खेळाडू खेळाचा आनंद लुटतील, अधिक चांगले खेळतील. त्यामुळे सामना निश्चितच सोपा नसेल,`` असे सांगत फेरांडो यांनी ओडिशाला कमी लेखण्यास नकार दिला.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाची कामगिरी : 17 सामने, 5 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव

- ओडिशा एफसीची कामगिरी : 17 सामने, 1 विजय, 6 बरोबरी, 10 पराभव

- एफसी गोवाचे 26, तर ओडिशाचे 17 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे एफसी गोवावर 21, तर ओडिशावर 30 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 12 गोल, दुसऱ्या क्रमांकावर

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोगेरोचे स्पर्धेत सर्वाधिक 8 असिस्ट

- सलग 10 लढतीत एफसी गोवा अपराजित, 3 विजय, 7 बरोबरी (6 सलग)

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे एफसी गोवाचा ओडिशावर 1-0 फरकाने विजय

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com