`टेन मेन` एफसी गोवास बरोबरीचेच समाधान; केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून रोखले

`टेन मेन` एफसी गोवास बरोबरीचेच समाधान; केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून रोखले
ISL 2020 21 FC Goa ties match with Kerala Blasters

पणजी :  सामन्यातील बाकी 25 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवास सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी गोलबरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून येत त्यांना 1-1 असे रोखले.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. होर्गे ओर्तिझ याच्या थेट फ्रीकिकवर 25व्या मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळाली. पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीनंतर 57व्या मिनिटास सेटपिसेसवरील हेडिंगवर 20 वर्षीय राहुल केपी याने केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 65व्या एफसी गोवाचा एक खेळाडू कमी झाला. बचावपटू इव्हान गोन्झालेझ याला एका मिनिटात दोन यलो कार्ड मिळाल्यामुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्यापूर्वी पूर्वार्धात 25व्या मिनिटास एफसी गोवाचा नियमित बचावपटू जेम्स डोनाची याला पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते.

बरोबरीच्या एका गुणामुळे एफसी गोवाचे 13 लढतीतून 20 गुण झाले व तिसरा क्रमांक कायम राहिला. त्यांचे दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा चार गुण कमी आहेत. त्यांची ही स्पर्धेतील पाचवी बरोबरी ठरली. एफसी गोवा आता सहा सामने अपराजित आहे. स्पर्धेतील पाचवी बरोबरी नोंदविलेल्या केरळा ब्लास्टर्सचे 13 लढतीतून 14 गुण झाले आहेत. सलग चार सामने पराभवाविना असलेल्या संघाने सातव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली.

ओर्तिझचा फ्रीकिकवर गोल

जोर्जे ओर्तिझ याच्या झंझावाती फ्रीकिकवर एफसी गोवाने आघाडी मिळविली. ओर्तिझचा फटका केरळा ब्लास्टर्सच्या सहल अब्दुल समद याच्या डोक्याला लागल्यानंतर गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने चेंडू अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यापूर्वी, एफसी गोवाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांना सक्तीचा बदल करावा लागला. डाव्या पायाचा स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलियन बचावपटू जेम्स डोनाची याची जागा महंमद अली याने घेतली.  विश्रांतीस पाच मिनिटे असताना केरळा ब्लास्टर्सच्या आक्रमणासमोर एफसी गोवाचा गोलरक्षक नवीन कुमार पूर्णपणे चकला होता, पण केरळाच्या बकारी कोने याच्या हँडबॉलमुळे सहाय्यक रेफरींनी गोल नामंजूर केला.

राहुलचा बरोबरीचा गोल

बंगळूर एफसीविरुद्ध केरळा ब्लास्टर्ससाठी विजयी गोल केलेल्या राहुल केपी याने विश्रांतीनंतरच्या बाराव्या मिनिटास एफसी गोवाची आघाडी भेदली. फाकुंदो परेरा याच्या सणसणीत कॉर्नर किकवर राहुलने सुरेख हेडिंग साधत गोल केला.

गोन्झालेझला रेड कार्ड

सामन्याची शेवटची पंचवीस मिनिटे एफसी गोवास दहा खेळाडूंसह खेळावे लागले. एफसी गोवाचा स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने केरळाच्या फाकुंदो परेरा याला पाडल्यामुळे त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले, त्यावेळी आपली बाजू पटवून देताना गोन्झालेझ याने रेफऱी रणजित बक्सी यांना हात लावला, त्यामुळे लगेच दुसरे यलो कार्ड मिळाल्यामुळे गोन्झालेझला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाच्या होर्गे ओर्तिझ याचे स्पर्धेत 5 गोल

- केरळा ब्लास्टर्सच्या राहुल केपी याचे यंदा 3, तर 19 आयएसएल लढतीत 4 गोल

- सलग 6 लढतीत एफसी गोवाचे 3 विजय, 3 बरोबरी

- केरळा ब्लास्टर्सच्या 4 लढतीत 2 विजय, 2 बरोबरी

- एफसी गोवा व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील 14 आयएसएल लढतीत 2 बरोबरी

- यंदा पहिल्या टप्प्यात एफसी गोवाचा 3-1 फरकाने विजय
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com