ISL 2020-21स्पर्धेच्या इतिहासात गोव्यातील या प्रमुख मैदानावर होणार आयएसएलचा अंतिम सामना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम सामना 13 मार्च रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम सामना 13 मार्च रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. स्पर्धेच्या इतिहासात गोव्यातील या प्रमुख मैदानावर तिसऱ्यांदा स्पर्धेची अंतिम लढत होईल.

आयएसएल स्पर्धेचे आयोजन फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल)  2020-21 मोसमातील प्ले-ऑफ (उपांत्य) व अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. सध्या एटीके मोहन बागान व मुंबई सिटी एफसी यांनी प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळविली असून बाकी दोन जागांसाठी चुरस आहे. स्पर्धेच्या अजून तीन फेऱ्या बाकी आहेत. साखळी फेरीतील शेवटचा सामना 28 फेब्रुवारीस होईल.

आयएसएल स्पर्धेच्या अंतिम लढतीचे यजमानपद फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सलग दुसऱ्यांदा आणि विक्रमी तिसऱ्यांदा भूषवत आहे. 2019-20 मोसमात या मैदानावर कोविड-19 मुळे बंद दरवाज्याआड एटीके व चेन्नईयीन यांच्यात अंतिम लढत झाली होती, त्यात कोलकात्याच्या संघाने विजेतेपद मिळविले होते. त्यापूर्वी २०१५ मोसमात याच मैदानावर अंतिम सामना झाला होता. तेव्हा चेन्नईयीनने एफसी गोवास निसटते नमवून बाजी मारली होती.

आयएसएलच्या सातव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीचा पहिला टप्पा पाच व सहा मार्च रोजी, तर दुसरा टप्पा आठ व नऊ मार्च रोजी होईल. हे सामने बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम व फातोर्ड्यात खेळले जातील.

अवे गोल नियम बाद

आयएसएलमध्ये यंदा अवे गोलचा नियम बाद ठरविण्यात आला आहे. दोन टप्प्यातील उपांत्य लढतीत दोन्ही संघांतील लढतीत गोलसरासरी महत्त्वपूर्ण ठरेल आणि सरस गोलसरासरी असलेल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

साखळी विजेता एएफसी चँपियन्स लीगमध्ये

आयएसएलच्या सातव्या मोसमातील साखळी फेरीत अव्वल ठरणारा संघ लीग शिल्ड विजेता ठरेल. या संघास पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळेल.

प्ले-ऑफ फेरीचे वेळापत्रक

  • पहिला टप्पा: 5 व 6 मार्च
  • दुसरा टप्पा:  8 व 9 मार्च
  • अंतिम सामना : 13 मार्च
     

संबंधित बातम्या