`सुपर सब` लिस्टनचे गोल हैदराबादसाठी लाखमोलाचे ; नॉर्थईस्ट युनायटेडवर ४-२ फरकाने विजय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

गोमंतकीय आघाडीपटू `सुपर सब` लिस्टन कुलासो याने  सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत नोंदविलेल्या दोन प्रेक्षणीय गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल रोमहर्षक विजयास गवसणी घातली.

पणजी : गोमंतकीय आघाडीपटू `सुपर सब` लिस्टन कुलासो याने  सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत नोंदविलेल्या दोन प्रेक्षणीय गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल रोमहर्षक विजयास गवसणी घातली. अटीतटीच्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 4-2 फरकाने हरवून मोसमात चौथ्यांदा पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. 22 वर्षीय लिस्टनने निर्णायक गोल 85व्या मिनिटास डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर नोंदविला. यावेळी त्याने हाणलेला ताकदवान फटका डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. तो 64व्या मिनिटास बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्यानंतर 90+4व्या मिनिटास लिस्टनने आणखी एक गोल करताना सोलो प्रयत्नावर गोलरक्षक सुभाशिष रॉयचा बचाव भेदला.

त्यापूर्वी, हैदराबादसाठी कर्णधार आरिदाने सांताना याने तिसऱ्या, तर ऑस्ट्रेलियन जोएल चियानेज याने 36व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. 45व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर उरुग्वेयन फेडेरिको गेलेगो याने नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी कमी केल्यानंतर 45+2व्या मिनिटास बेल्जियन बेंजामिन लँबॉट याने गुवाहाटीच्या संघाला बरोबरी साधून दिली.

हैदराबादचा हा 10 लढतीतील चौथा विजय असून त्यांचे एफसी गोवाइतकेच 15 गुण झाले, मात्र दोन गोल जास्त नोंदविलेले असल्याने हैदराबादला तिसरा क्रमांक मिळाला आहे. हैदराबादने 15, तर एफसी गोवाने 13 गोल केले आहेत. हैदराबादचा हा सलग दुसरा विजय ठरला. नॉर्थईस्ट युनायटेडला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचा हा 10 लढतीतील एकंदरीत तिसरा पराभव ठरला त्यामुळे 11 गुण आणि सातवा क्रमांक कायम राहिले.

पूर्वार्धातील खेळ नाट्यमय आणि चुरशीचा ठरला. हैदराबादने दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर नॉर्थईस्टने अफलातून मुसंडी मारत पिछाडी भरून काढली. त्यामुळे विश्रांतीला गोलफरक बरोबरीत राहिला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास हुकमी खेळाडू आरिदाने सांताना याने नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाशिष रॉय याला चकवत हैदराबादला आघाडी मिळवून दिली. जोएल चियानेजने मध्यक्षेत्रात चेंडू मिळाल्यानंतर वेगवान धाव घेत नॉर्थईस्टच्या गोलक्षेत्रात धडक दिली. नंतर माशूर शेरीफ आणि गुरजिंदर सिंग या बचावपटूंना चकवा देत सांताना याला सुरेख पास दिला. अर्ध्या तासाच्या खेळानंतर चियानेजने सलग दुसऱ्या सामन्यात गोल करत हैदराबादची आघाडी वाढविली. नॉर्थईस्टची बचावफळी दबावाखाली कोलमडली, त्याचा लाभ उठवत चियानेजने आकाश मिश्राच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी बचावपटू आशुतोष मेहता व खासा कामारा यांनाही गुंगारा देत गोल केला.

पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना नॉर्थईस्टला पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. हालीचरण नरझारी याने चेंडूवर ताबा राखण्याच्या प्रयत्नात गोलक्षेत्रात प्रतिस्पर्धी आशुतोष मेहता याला पाडण्याची चूक केली. रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली असताना फेडेरिको गेलेगो याने गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीस आरामात चकवा देणारा फटका मारला. पूर्वार्धातील इंज्युरी टाईममधील दुसऱ्याच मिनिटास हैदराबादला आणखी एक झटका बसला. नॉर्थईस्टने गोलक्षेत्रात जोरदार आक्रमण रचले असता हैदराबादचा बचाव कोसळला. आशुतोष मेहताच्या फटक्यावर गोलरक्षक कट्टीमनीच्या हातास चेंडू लागल्यानंतर गोलपट्टीस आपटून पुन्हा मैदानात आला. इद्रिसा सिला याचा फटका कट्टीमनीने पुन्हा अडविला, पण बेंजामिन लँबॉटचा रिबाऊंड फटका अडविणे गोलरक्षकास शक्य झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे यंदाच्या मोसमात 6, तर स्पर्धेत एकूण 15 गोल

- हैदराबादच्या जोएल चियानेज याचे सलग सामन्यात मिळून मोसमात 2 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडच्या फेडेरिको गेलेगो याचा मोसमातील पहिलाच, तर स्पर्धेत एकंदरीत      6 गोल

- नॉर्थईस्टच्या बेंजामिन लँबॉटचे मोसमात 2 गोल

- लिस्टन कुलासोचे मोसमात 2, तर आयएसएलमध्ये एकूण 4 गोल
 

संबंधित बातम्या