मुंबई सिटीने दोन गुण गमावले ; प्रभावी हैदराबादने गोलशून्य बरोबरीत रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

मुंबई सिटीस काल सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले, मात्र त्यांचे अग्रस्थान अबाधित राहिले.

पणजी :  प्रभावी खेळ केलेल्या हैदराबाद एफसीने गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे मुंबई सिटीस काल सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले, मात्र त्यांचे अग्रस्थान अबाधित राहिले.

सामना काल बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. बरोबरीच्या एका गुणानंतर मुंबई सिटीचे 11 लढतीनंतर 26 गुण झाले. त्यांची ही दुसरीच बरोबरी ठरली. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा त्यांचे सहा गुण जास्त आहेत. हैदराबादची ही चौथी बरोबरी ठरली. त्यांचे 11 लढतीनंतर 16 गुण झाले असून चौथा क्रमांक कायम राहिला.

मुंबई सिटीस आज सफाईदार आक्रमक खेळ करणे जमले नाही. अमरिंदर सिंगने गोलरक्षणात दक्षता दाखविली नसती, तर कदाचित सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागला असता. त्यांना हुकमी मध्यरक्षक ह्युगो बुमूस याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दुसरीकडे मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने आक्रमणावर जास्त भर देत मुंबई सिटीस बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले.

सामन्याच्या गोलशून्य पूर्वार्धात हैदराबादने आक्रमणावर लक्ष केंद्रीत करताना मुंबई सिटीच्या बचावफळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईचा अनुभवी गोलरक्षक अमरिंदर सिंग लौकिकास जागला. हैदराबादच्या बचावफळीत आकाश मिश्रा उल्लेखनीय ठरला, त्यामुळे मुंबई सिटीच्या आक्रमणांना विशेष संधी मिळाली नाही. 33व्या मिनिटास अमरिंदर सिंगने अफलातून एकाग्रता प्रदर्शित केल्यामुळे हैदराबादला आघाडीपासून वंचित राहावे लागले. महंमद यासीरने दिलेल्या पासवर जोएल चियानेजने मुंबई सिटीच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. समोर फक्त गोलरक्षक असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या फटक्यासमोर सारा अनुभव पणाला लावत अमरिंदरने पायाचा कल्पकतेने वापर करत हैदराबादला आघाडी मिळू दिली नाही.

विश्रांतीनंतरच्या चौथ्याच मिनिटास लिस्टन कुलासोने मुंबई सिटीच्या रिंगणात मुसंडी मारली होती. त्याच्या फटक्याचा गोलरक्षक अमरिंदरला व्यवस्थित अंदाज बांधता आला नाही, पण फटका दिशाहीन ठरल्यामुळे मुंबई सिटीचे नुकसान झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये 9 लढतीनंतर गोल करण्यात मुंबई सिटीस अपयश, मोसमात               एकंदरीत दुसऱ्यांदा

- मुंबई सिटीच्या 7, तर हैदराबादच्या 3 क्लीन शीट्स

- हैदराबादची 8 लढतीनंतर क्लीन शीट

- मुंबई सिटीची मोसमात 2 बरोबरी, गोलशून्य प्रथमच

- हैदराबादच्या 4 बरोबरी, गोलशून्य 2

- सलग 4 विजयानंतर मुंबई सिटीस बरोबरीचा 1 गुण

- हैदराबादची सलग 2 विजयानंतर बरोबरी

संबंधित बातम्या