इंज्युरी टाईममध्ये साधले लक्ष्य; बंगळूर सहा सामने विजयाविना

इंज्युरी टाईममध्ये साधले लक्ष्य; बंगळूर सहा सामने विजयाविना
ISL 2020 21 Kerala blasters beats Bangalore FC by 1 goal

पणजी :  राहुल केपी याने इंज्युरी टाईममध्ये नोंदवलेल्या स्पृहणीय गोलच्या बळावर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सने माजी विजेत्या बंगळूर एफसीला 2-1 फरकाने पराभवाचा धक्का दिला. बंगळूर आता सलग सहा सामने विजयाविना आहे.

सामना बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने 24व्या मिनिटास बंगळूरला आघाडी मिळवून दिली. बदली खेळाडू लाल्थाथांगा खॉल्हरिंग याने 73व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. तो 46व्या मिनिटास जॉर्डन मरे याच्या जागी मैदानात उतरला होता. इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास वीस वर्षीय मध्यरक्षक राहुल केपी याने केरळा ब्लास्टर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. त्याने गॅरी हूपरच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूला चकविले.

केरळा ब्लास्टर्सचा हा 12 लढतीतील तिसराच विजय ठरला, त्यांचे आता 13 गुण झाले आहेत. बंगळूरला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 13 गुण कायम राहिले. बंगळूरला सहा लढतीत पाच पराभव व एका बरोबरीचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांचे समान गुण असले, तरी गोलसरासरीत बंगळूर (-2) सातव्या स्थानी कायम आहे, तर केरळा ब्लास्टर्सला (-5) नववा क्रमांक मिळाला आहे. जमशेदपूरचेही (-4) 13 गुण असून ते आठव्या क्रमांकावर आहेत.

बंगळूरने पूर्वार्धात एका गोलची आघाडी घेतली होती. 33 वर्षीय ब्राझीलियन मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याच्या सणसणीत फटक्यावर गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली. राहुल भेके याच्या उजव्या बाजूतील भेदक थ्रो-ईनवर केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूंना चेंडूचा अंदाज आला नाही, त्याचा लाभ उठवत क्लेटन याने सणसणीत फटक्यावर गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला चकविले.

पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास बंगळूरला दोन गोलांची आघाडी शक्य होती, सुनील छेत्रीचा धोकादायक प्रयत्न गोलरक्षक आल्बिनो याने विफल ठरविल्यामुळे बंगळूरची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

सामना संपण्यास सोळा मिनिटे बाकी असताना केरळा ब्लास्टर्सने बरोबरी साधली. गॅरी हूपरचा फटका अडविताना गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या तोंडावर चेंडू जोरात आपटला, त्यामुळे संधूने जमिनीवर वेदनेसह लोळण घेतली. त्यानंतर गोलरक्षक जाग्यावर नसल्याची संधी साधत 22 वर्षीय मध्यरक्षक लाल्थाथांगा याने केरळच्या संघाची पिछाडी भरून काढली.

सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांच्या खेळात बंगळूरने आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण गोलरक्षक आल्बिनो गोम्स व दक्ष बचावफळेने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.

दृष्टिक्षेपात...

- क्लेटन सिल्वा याचे 12 आयएसएल लढतीत 4 गोल

- क्लेटनचे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 2 गोल, पहिल्या टप्प्यातही आघाडीचा गोल

- लाल्थाथांगा खॉल्हरिंग याचा 36 आयएसएल लढतीत 1 गोल

- 20 वर्षीय मध्यरक्षक राहुल केपी याचे यंदा 2 गोल, पहिल्या टप्प्यातही बंगळूरविरुद्धच    गोल

- राहुलचे 18 आयएसएल सामन्यात एकूण 3 गोल

- यंदाच्या मोसमात केरळा ब्लास्टर्सचे 16, तर बंगळूरचे 14 गोल

- पहिल्या टप्प्यात बंगळूरची केरळा ब्लास्टर्सवर 4-2 फरकाने मात
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com