खेळाडू कमी होऊनही केरळा ब्लास्टर्स विजयी ; व्हॅल्सकिसच्या धडाक्यानंतरही जमशेदपूर पराभूत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

केरळा ब्लास्टर्सचा उत्तरार्धात एक खेळाडू कमी झाला, तरीही त्यांनी झुंज दिली. ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर जॉर्डन मरे तीन मिनिटांत केलेल्या दोन गोलच्या बळावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला.

वास्को :  केरळा ब्लास्टर्सचा उत्तरार्धात एक खेळाडू कमी झाला, तरीही त्यांनी झुंज दिली. ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर जॉर्डन मरे तीन मिनिटांत केलेल्या दोन गोलच्या बळावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. त्यांनी जमशेदपूर एफसीला ३-२ फरकाने हरविले, त्यामुळे नेरियूस व्हॅल्सकिस याचे दोन गोल फलदायी ठरले नाहीत.

सामना काल वास्को येथील टिळक मैदानावर झाला. लढत रंगतदार ठरली. विशेषतः शेवटच्या शेवटच्या २३ मिनिटांचा खेळ नाट्यमय ठरला. केरळा ब्लास्टर्सने एक खेळाडू कमी झाल्यानंतरही विजय निसटू दिला नाही, त्यांनी जोरदार मुसंडी मारली व मोसमात दुसऱ्यांदा विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

सामन्याच्या ६७व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सचा एक खेळाडू कमी झाला. बचावपटू लालरुआथारा याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्याला पहिले यलो कार्ड ४९व्या मिनिटास मिळाले होते. त्यानंतरही अनुक्रमे ७९व्या व ८२व्या मिनिटास गोल नोंदवत ऑस्ट्रेलियन आघाडीपटू जॉर्डन मरे याने केरळा ब्लास्टर्सच्या आघाडीवर शिक्कामोर्तब केले. केरळा ब्लास्टर्सचा अन्य एक गोल कॉस्ता न्हामोईनेसू याने नोंदविला. ८४व्या मिनिटास लिथुआनियाचा ३३ वर्षीय आघाडीपटू नेरियूस व्हॅल्सकिस याच्या भेदक हेडिंगमुळे जमशेदपूरने पिछाडी २-३ अशी कमी केली. त्याने पहिला गोल ३६व्या मिनिटास थेट फ्रीकिकवर केला होता.

त्यापूर्वी ब्राझीलियन फाकुंदो परेरा याच्या फ्रीकिक फटक्यावर झिंबाब्वेचा ३५ वर्षीय बचावपटू कॉस्ता न्हामोईनेसू याने झंझावाती हेडिंगद्वारे केरळा ब्लास्टर्सला आघाडीवर नेले होते. सेटपिसेसवर यश मिळविताना कॉस्ता याने त्याच्यावर पहारा ठेवलेल्या स्टीफन एझे याला चकविले. त्यानंतर ३६व्या मिनिटास थेट फ्रीकिकवर नेरियूस व्हॅल्सकिस याने जमशेदपूरला १-१ अशी गोलबरोबरी साधून दिली. यावेळी त्याने केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला वेगवान फटक्यावर चकविले.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सचा हा १० लढतीतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता नऊ गुण झाले असून ते दहाव्या क्रमांकावर आले आहेत. जमशेदपूरला १० लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे १३ गुणांसह त्यांचा पाचवा क्रमांक कायम राहिला. सामना गमावल्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघास तिसरा क्रमांक हुकला.

दृष्टिक्षेपात...
- केरळा ब्लास्टर्सच्या कॉस्ता न्हामोईनेसू याचा ७ आयएसएल लढतीत १ गोल
- जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिस याचे यंदा १० लढतीत ८ गोल
- आयएसएलमधील ३० सामन्यात नेरियूस व्हॅल्सकिस याचे एकूण २३ गोल
- केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे यंदा १० लढतीत ५ गोल
- केरळा ब्लास्टर्सवर प्रतिस्पर्ध्यांचे आता १९ गोल

संबंधित बातम्या