ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीच अव्वल ; एटीके मोहन बागानला एका गोलने नमवून पाच गुणांची भक्कम आघाडी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

सामन्याच्या उत्तरार्धात नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान अधिकच भक्कम केले.

पणजी : सामन्याच्या उत्तरार्धात नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान अधिकच भक्कम केले. त्यांनी एटीके मोहन बागानला 1-0 फरकाने हरवून पाच गुणांची मजबूत आघाडी प्राप्त केली.

सामना काल फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. मुंबई सिटीचा 10 लढतीतील आठवा विजय ठरला. त्यांचे आता 25 गुण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, मुंबई सिटी संघ सलग नऊ सामने अपराजित आहे. त्यात आठ विजय व एका बरोबरीचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडने हरविले होते, त्यानंतर या संघाने एकही लढत गमावलेली नाही.

स्पर्धेत पाच लढतीनंतर अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानला पराभव पत्करावा लागला. एकंदरीत 10 लढतीतील त्यांची ही दुसरी हार ठरली. त्यांचे 20 गुणांसह दुसरे स्थान कायम राहिले.

पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी अखेर नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने 69व्या मिनिटास भेदली. प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी सोमवारी ओगबेचे यांनी सुरवातीच्या संघात स्थान दिले आणि 36 वर्षीय खेळाडूने प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरविताना संघातील प्ले-मेकर खेळाडू ह्युगो बुमूस याचे असिस्ट निर्णायक ठरविले. एटीके मोहन बागानचा कर्णधार-गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने यंदाच्या स्पर्धेत स्वीकारलेला हा चौथाच गोल ठरला.

सामन्याच्या 58व्या मिनिटास एटीके मोहन बागानच्या एदू गार्सिया याने जवळपास गोल केला होता, पण त्याचा कमजोर फटका गोलपोस्टला आपल्यामुळे त्यांना आघाडी घेता आली. यावेळी गार्सियाने मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला चकवा दिला होता. त्यानंतर लगेच ओगबेचे याला गोल करण्याची संधी प्राप्त झाली होती, मात्र यावेळी तो गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याला भारी ठरू शकला नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीतर्फे बार्थोलोमेव ओगबेचे याचे यंदा 4 गोल

- आयएसएल स्पर्धेत ओगबेचे याचे 44 लढतीत 31 गोल

- तब्बल 4 लढतीनंतर एटीके मोहन बागानवर प्रतिस्पर्ध्याचा गोल

- मुंबई सिटीचे यंदा स्पर्धेत सर्वाधिक 17 गोल

- मुंबई सिटीच्या स्पर्धेत आता 6 क्लीन शीट

संबंधित बातम्या