नॉर्थईस्टकडून मुंबई सिटीस`ब्राऊन वॉश`पराभवामुळे लोबेरांच्या संघाची अपराजित मालिका खंडित; विक्रम हुकला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुंबई सिटीस दोन वेळा पराभूत करण्याची किमया साधली.

पणजी : जमैकन स्ट्रायकर देशॉर्न ब्राऊन याने पूर्वार्धात तीन मिनिटांत नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुंबई सिटीस दोन वेळा पराभूत करण्याची किमया साधली. 1-2 फरकाने सामना गमावल्यामुळे स्पर्धेत सर्वाधिक सामने अपराजित राहण्याचा विक्रम सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघास हुकला. सामना शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. जानेवारीतील ट्रान्स्फरमध्ये बंगळूर एफसीकडून नॉर्थईस्ट संघात आलेल्या ब्राऊनने अनुक्रमे सहाव्या व नवव्या मिनिटास गोल केला. मुंबई सिटीची पिछाडी 85व्या मिनिटास बदली खेळाडू इंग्लंडचा एडम ली फाँड्रे याने कमी केली.

हैदराबादची नजर तिसऱ्या क्रमांकावर- चेन्नईशी गाठ; एटीके मोहन बागानला केरळा...

यंदाच्या स्पर्धेत सलग 12 लढती अपराजित राहिल्यानंतर मुंबई सिटीस स्पर्धेतील अवघा दुसरा पराभव पत्करावा लागला. 21 नोव्हेंबर 2020 रोजी वास्को येथील टिळक मैदानावर सनसनाटी निकाल नोंदविताना नॉर्थईस्टने मुंबई सिटीस 1-0 फरकाने हरविले होते, त्यानंतर मुंबईतील संघाने सलग सामन्यात नऊ विजय व तीन बरोबरीची नोंद केली होती. 2015 साली दुसऱ्या मोसमात एफसी गोवा 12 सामने अपराजित होता, मुंबई सिटी आता या कामगिरीचे संयुक्त मानकरी आहेत.अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडचा हा सलग तिसरा, तर एकंदरीत पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 14 लढतीनंतर 21 गुण झाले असून त्यांनी एफसी गोवास गाठले आहे. गोलसरासरीत गोवा तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई सिटीचे 14 लढतीनंतर 30 गुणांसह अग्रस्थान कायम राहिले. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा त्यांचे सहा गुण जास्त आहेत.

धेंपो फुटबॉल क्लब अकादमी पुन्हा सक्रिय

ब्राऊनचे तीन मिनिटांत दोन गोल

जमैकाच्या देशॉर्न ब्राऊनच्या झंझावातामुळे पहिल्या नऊ मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीस दोन जबरदस्त झटके बसले. या तीस वर्षीय आघाडीपटूने तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे गुवाहाटीच्या संघाचे पारडे जड झाले. सहावे मिनिट सनसनाटी ठरले. नॉर्थईस्टच्या लुईस माशादो याने पेनल्टी क्षेत्राबाहेरून मारलेला सनसनाटी फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने अडविला, पण चेंडू व्ही. सुहैर याच्याकडे गेला. त्याने चेंडू निम दोरजी याच्याकडे पास केला. नॉर्थईस्टच्या बचावपटूने ब्राऊनला क्रॉसपास दिला असता सणसणीत फटक्यावर पहिल्या गोलची नोंद झाली. तीन मिनिटानंतर मुंबई सिटीचा बचाव सेटपिसेसवर हादरला. फेडेरिको गालेगोच्या कॉर्नर फटक्यावर मुंबई सिटीचा हर्नान सांताना व्यवस्थित हेडिंग साधत चेंडू दिशाहीन करू शकला नाही. त्याचा लाभ उठवत लुईस सांतानाने ब्राऊनकडे चेंडू टाकला असता जमैकन खेळाडूने गोल करण्यात चूक केली नाही.

संधी हुकली

विसाव्या मिनिटास ब्राऊनची हॅटट्रिक संधी हुकल्यामुळे नॉर्थईस्टची आघाडी दोन गोलपुरती मर्यादित राहिली. त्यानंतर विश्रांतीला चार मिनिटे असताना मुंबई सिटीच्या अहमद जाहू याचा सणसणीत फटका नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक सुभाशिष रॉय याने झेपावत यशस्वी ठरू दिला नाही. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास लालेंगमावियाचा याचा धोकादायक प्रयत्न गोलरक्षक अमरिंदर सिंगने उधळून लावल्यामुळे नॉर्थईस्टला तीन गोलची आघाडी घेता आली नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये अहमद जाहूच्या फ्रीकिकवर मेहताब सिंग याने हेडर गोलरक्षक सुभाशिष रॉयने विफल ठरविल्यामुळे नॉर्थईस्टची आघाडी अबाधित राहिली.

दृष्टिक्षेपात...

- जमैकाच्या 30 वर्षीय देशॉर्न ब्राऊनचे नॉर्थईस्टतर्फे 3 सामन्यात 3 गोल

- मोसमाच्या सुरवातीस बंगळूर एफसी संघात, आयएसएलमधील 20 लढतीत ब्राऊनचे एकूण 6 गोल

- एडम ली फाँड्रे याचे आयएसएलमधील 14 सामन्यात 7 गोल

- मुंबई सिटीचे यंदा आयएसएलमध्ये सर्वाधिक 20 गोल, एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रत्येकी 19 गोल

संबंधित बातम्या