नॉर्थईस्टचा एटीके मोहन बागानला झटका; माशादो, गालेगो यांच्या गोलमुळे विजय नोंदवत पहिल्या पाच संघांत

ISL 2020 21 Northeast United entered into top five list by beating ATK Mohun Bagan
ISL 2020 21 Northeast United entered into top five list by beating ATK Mohun Bagan

पणजी :  नॉर्थईस्ट युनायटेडने सुधारित खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी एटीके मोहन बागानला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पराभवाचा झटका दिला. लुईस माशादो व फेडेरिको गालेगो यांच्या गोलच्या बळावर गुवाहाटीच्या संघाने सामना 2-1 फरकाने जिंकून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली व पहिल्या पाच संघांत स्थान मिळविले. सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्यातील तिन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. नॉर्थईस्ट युनायटेडसाठी पोर्तुगीज स्ट्रायकर लुईस माशादो याने 60व्या, तर उरुग्वेयन मध्यरक्षक फेडेरिको गालेगो याने 81व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. एटीके मोहन बागानतर्फे फिजी देशाचा आघाडीपटू रॉय कृष्णा याने 72व्या मिनिटास गोल नोंदविला. गालेगो सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नॉर्थईस्ट युनायटेडला एटीके मोहन बागानकडून दोन गोलनी पराभव पत्करावा लागला होता, त्याची परतफेड अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने केली. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा एकंदरीत 13 लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता 18 गुण झाले आहेत. त्यांच्याइतकेच हैदराबाद एफसीचेही गुण आहेत, हैदराबादने +2 गोलफरकामुळे चौथा, तर शून्य गोलफरकामुळे नॉर्थईस्टला पाचवा क्रमांक मिळाला. अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानला तिसरा पराभव पत्करावा लागला. 13 लढतीनंतर त्यांचे 24 गुण आणि दुसरा क्रमांक कायम राहिला. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा कोलकात्याच्या संघाचे सहा गुण कमी आहेत.

तासाभराच्या खेळात नॉर्थईस्टने आघाडी घेतली. फेडेरिको गालेगो याच्या असिस्टवर एटीके मोहन बागानच्या बचावफळीत छेद देत पोर्तुगीज आघाडीपटू लुईस माशादो याने गुवाहाटीच्या संघाचे खाते उघडले. एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने मोसमात स्वीकारलेला हा अवघा सहावा गोल ठरला. या गोलस एटीके मोहन बागानचा आक्षेप होता, पण रेफरीने ग्राह्य धरला.सामन्याची अठरा मिनिटे बाकी असताना कर्णधार रॉय कृष्णा याच्या डाव्या पायाच्या फटक्याने एटीके मोहन बागानला बरोबरी साधता आली. तीन लढतीनंतर या 33 वर्षीय आघाडीपटूने अखेर गोल नोंदविला. कोमल थाटल याने रचलेल्या चालीवर कार्ल मॅकह्युज याने कृष्णाला गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली.

शानदार गोलवर फेडेरिको गालेगो याने बरोबरीची कोंडी फोडत नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिला. यावेळी रोछार्झेला याच्या असिस्टवरील गालेगोच्या फटक्यावर चेंडूने गोलरक्षक अरिंदमला चकवा देत गोलपोस्टचा वेध घेतल्यानंतर नेटमध्ये जागा मिळविली.त्यापूर्वी, सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. तुलनेत नॉर्थईस्ट युनायटेडची आक्रमणे जास्त तीव्र होती, मात्र नेमबाजीत अचूकतेचा अभाव राहिला. अर्ध्यातासाच्या खेळानंतर माशादो याने सणसणीत फटका मारला होता, मात्र गोलरक्षक अरिंदम दक्ष राहिल्याने कोलकात्याच्या संघाचे नुकसान झाले नाही. सामन्याच्या 69व्या मिनिटास नॉर्थईस्टची आणखी एक संधी अरिंदमच्या कडक पहाऱ्यामुळे फोल ठरली. खासा कामारा याचा ताकदवान फटका गोलरक्षकाने झेपावत अडविला. 78व्या मिनिटास कोमल थाटलच्या फटक्यावर नॉर्थईस्ट युनायटेडच्या निम दोरजी याने गोलरेषेवर चेंडू रोखल्यामुळे कोलकात्याच्या संघाला आघाडी मिळू शकली नाही.

दृष्टिक्षेपात

- नॉर्थईस्ट युनायटेडच्या लुईस माशादोचे मोसमातील 13 सामन्यांत 4 गोल

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा याचे मोसमात 13 लढतीत 7 गोल

- कृष्णाचे आयएसएलमधील 34 सामन्यांत एकूण 22 गोल

- फेडेरिको गालेगो याचे मोसमातील 9 सामन्यांत 2 गोल

- आयएसएमधील 39 सामन्यांत गालेगो याचे एकूण 7 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडचे यंदा स्पर्धेत 17, तर एटीके मोहन बागानचे 13 गोल
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com