हैदराबादसमोर एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाला रोखण्याचे मोठे आव्हान

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसी यांच्यातील सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. 

पणजी- एटीके मोहन बागानची बचाव फळी भेदणे शक्य असल्याचे मागील लढतीत सिद्ध झाले. हैदराबाद एफसीच्या आक्रमकांनी शुक्रवारी (ता. 11) जोरकस खेळ केल्यास इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आणखी एका सनसनाटी निकालाची शक्यता असेल. एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसी यांच्यातील सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. 

त्यावेळी एटीके मोहन बागानच्या आघाडीफळीतील फिजी देशाचा धोकादायक रॉय कृष्णा याला रोखण्याचे हैदराबादसमोर मोठे आव्हान असेल. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात कृष्णा प्रतिस्पर्ध्यांना त्रासदायक ठरला आहे. संघाने नोंदविलेल्या पाच गोलपैकी कृष्णाने चार गोल केले आहेत. याविषयी एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांनी सांगितले, की ``सर्व खेळाडूंचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिक चांगल्या सहयोगातून अधिक खेळाडूंनी गोल करण्याची कल्पना आहे.``

हैदराबादने तीन सामन्यांत फक्त एकच गोल स्वीकारला आहे, त्यामुळे उद्या एटीके मोहन बागानच्या आक्रमकांना मोकळीक मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

 आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमात तब्बल तीनशे मिनिटे गोल न स्वीकारलेल्या गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जा याला मागील लढतीत जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिस याने दोन वेळा चकविले. त्यामुळे एटीके मोहन बागानला सलग तीन सामने अपराजित राहिल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेषतः सेटपिसेसवर एटीके मोहन बागानच्या बचावफळीत दक्ष राहावे लागेल. या त्रुटीकडे लक्ष पुरविले असल्याचे हबास यांनी नमूद केले.

हैदराबादने आक्रमणात धडाका राखल्यास बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नमवून त्यांना विजयासह गुणतक्त्यातील स्थान सुधारता येईल, मात्र त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच गोल नोंदविले आहेत. ``आपला संघ बचावफळीत चांगली कामगिरी करत असला, तरी अधिक गोल करावे लागतील, तेच आमचे लक्ष्य आहे,`` असे हैदराबादचे सहाय्यक प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी सांगितले. खेळातील सर्व क्षेत्रांत सखोलता असल्यामुळे एटीके मोहन बागान खडतर प्रतिस्पर्धी असल्याचे सिंगटो यांनी मान्य केले.

दृष्टिक्षेपात-

 गतमोसमात एटीकेचा कोलकाता येथे हैदराबादवर 5-0 ने विजय, तर हैदराबाद येथे 2-2 ने बरोबरी

एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 4, तर हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 2 गोल

 गुणतालिका काय म्हणते? 

एटीके मोहन बागान-  3 विजय, 1 पराभव,   गुण 9

 हैदराबाद- 1 विजय,     2 बरोबरी,    गुण 5 

संबंधित बातम्या