एफसी गोवाला पाऊल पुढे टाकण्याची संधी; एका गुणासह संघर्ष करणाऱ्या ओडिशाविरुद्ध आज महत्त्वाचा सामना

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

ओडिशा एफसीची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी पाहता, एफसी गोवास शनिवारी (ता. 12) एक पाऊल पुढे टाकण्याची संधी असेल.

पणजी-  ओडिशा एफसीची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी पाहता, एफसी गोवास शनिवारी (ता. 12) एक पाऊल पुढे टाकण्याची संधी असेल. अपेक्षित निकाल गवसल्यास गोव्यातील संघाचे गुणतक्त्यातील स्थानही सुधारेल.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवाने मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला नमवून स्पर्धेत प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई केली. स्पॅनिश ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे चार लढतीतून सध्या पाच गुण आहेत. दुसरीकडे इंग्लंडचे स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला अजून सूर गवसलेला नाही. ते अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. मागील सलग दोन लढती गमावलेल्या या संघाच्या खाती चार लढतीनंतर फक्त एक गुण असून ते दहाव्या स्थानी आहेत. एफसी गोवा एक चांगला संघ असल्याने त्यांच्याप्रती आदर असल्याचे सांगत बॅक्स्टर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला बचावात्मक पवित्रा घेतला.

``आम्ही ओडिशाविरुद्धच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. मागील सामन्यात तीन गुण मिळालेले आहेत, आता संघ अधिक सकारात्मक विचार करत आहे. केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा निकाल इतिहासजमा आहे,`` असे फेरॅन्डो यांनी सांगितले. एफसी गोवा संघाला अजूनही भरपूर प्रगती साधणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार फेरॅन्डो यांनी केला. आपल्या संघाने आक्रमणावर जास्त भर देणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटते.

एफसी गोवाचा स्ट्रायकर आंगुलो नियमितपणे गोल नोंदवत आहे आणि त्याचा मोठा धोका असल्याचे ओडिशाचे प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांचे मत आहे. ``एफसी गोवाला जास्त वर्चस्व राखण्यापासून रोखताना आम्हाला सततपणे त्यांच्यासमोर आव्हान राखावे लागेल,`` असे ओडिशाच्या प्रशिक्षकांनी नमूद केले.  

 

दृष्टिक्षेपात
- एफसी गोवाचे 4 लढतीत 6 गोल, तर तेवढ्याच सामन्यात ओडिशाचे 2 गोल
- एफसी गोवाचा स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलोचे 4 लढतीत 5 गोल
- गतमोसमातील दोन्ही लढतीत एफसी गोवा विजयी, फातोर्डा येथे 3-0, तर भुवनेश्वर येथे 4-2 गोलफरक
- मागील 2 लढतीत एफसी गोवाचे 4 गोल, तर ओडिशाचा एकही गोल नाही
- एफसी गोवाचा कर्णधार मध्यरक्षक एदू बेदियाचे यंदाच्या 4 लढतीत 315 पास
 

संबंधित बातम्या