इंडियन सुपर लीग 2020: अपराजित संघांचे लक्ष पूर्ण गुणांवर

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 12 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात गुवाहाटीचा नॉर्थईस्ट युनायटेड आणि बंगळूर एफसी संघ अपराजित आहे. रविवारी (ता. 13) त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यास, त्यांना गुणतक्त्यात प्रगतीची संधी राहील.

पणजी-  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात गुवाहाटीचा नॉर्थईस्ट युनायटेड आणि बंगळूर एफसी संघ अपराजित आहे. रविवारी (ता. 13) त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यास, त्यांना गुणतक्त्यात प्रगतीची संधी राहील. साहजिकच त्यांचे लक्ष विजयाच्या पूर्ण तीन गुणांवर असेल.

वास्को येथील टिळक मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेड व चेन्नईयीन एफसी यांच्यात, तर फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर्स यांच्यात सामना होईल. प्रतिस्पर्ध्यांची आतापर्यंतची कामगिरी पाहता, नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूर यांचे रविवारी खेळताना पारडे जड असेल.

स्पेनचे जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने मागील पाच लढतीत कौतुकास्पद खेळ केला आहे. दोन विजय आणि तीन बरोबरीसह त्यांनी नऊ गुणांची कमाई केली आहे. सध्या अव्वल असलेल्या मुंबई सिटीसही त्यांनी हरविले आहे. नॉर्थईस्टने स्पर्धेत आठ गोल नोंदविले आहेत, त्यामुळे चेन्नईयीनच्या बचावफळीवर दबाव असेल. बंगळूरविरुद्ध नॉर्थईस्टचे दोन्ही गोल पोर्तुगीज लुईस माशादो याने केले होते. रोछार्झेला यानेही चांगला खेळ केला आहे.

दुसरीकडे साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीनला अजून सूर गवसलेला नाही. चार लढतीत दोन पराभव, प्रत्येकी एक विजय व बरोबरी या कामगिरीसह त्यांच्यापाशी फक्त चार गुण आहेत. मागील लढतीत त्यांना मुंबई सिटीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईयीनला खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसू शकतो. उद्याच्या लढतीत चेन्नईयीन संघ आव्हान निर्माण करू शकतो, त्यामुळे सज्ज राहताना संपूर्ण नव्वद मिनिटे एकाग्रता आणि सातत्य राखण्याचे लक्ष्य नॉर्थईस्टचे प्रशिक्षक नूस यांनी बाळगले आहे.

कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर एफसीने सहा गुण प्राप्त केले आहेत. चार लढतीत एक विजय, तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. मागील लढतीत त्यांना नॉर्थईस्टविरुद्ध बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले होते. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सला अजूनही स्पर्धेत विजय गवसलेला नाही. चारपैकी दोन लढतीत बरोबरी आणि दोन पराभव अशा कामगिरीसह दोन गुण नोंदवून केरळचा संघ गुणतक्त्यात तळाकडील भागात आहे. त्यांनी सहा गोल स्वीकारले आहेत, त्यामुळे बंगळूरच्या आघाडीपटूंचे काम सोपे होऊ शकते. केरळा ब्लास्टर्सचा बचावपटू कॉस्ता न्हामोईनेसू याला एफसी गोवाविरुद्ध रेड कार्ड मिळाले होते. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध संघाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या भक्कम राहावे लागेल, असे मत बंगळूरचे प्रशिक्षक कुआद्रात यांनी व्यक्त केले

दृष्टिक्षेपात...

- गतमोसमात चेन्नई येथे चेन्नईयीनची नॉर्थईस्टवर 2-0 मात, गुवाहाटी येथे 2-2 बरोबरी

- मागील मोसमत बंगळूर येथे यजमानांची 1-0 अशी, तर कोची येथे केरळाची 2-1 फरकाने बाजी

- यंदाच्या स्पर्धेत नॉर्थईस्टचे 8, तर बंगळूरचे 5 गोल, चेन्नईयीन व केरळा ब्लास्टर्सतर्फे प्रत्येकी 3 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेड व चेन्नईयीन यांच्या 12 सामने, नॉर्थईस्टचे 6, चेन्नईयीनचे 3 विजय, 3 बरोबरी

- 6 लढतीत बंगळूरचे 4 विजय, केरळा ब्लास्टर्सचा 1 विजय, 1 बरोबरी

 

संबंधित बातम्या