ISL 2020-21: एटीके मोहन बागान अंतिम फेरीत दाखल

ISL 2020-21: एटीके मोहन बागान अंतिम फेरीत दाखल
ISL 202021 ATK Mohun Bagan enters final

पणजी : नॉर्थईस्ट युनायटेडच्या लुईस माशादो याने पेनल्टी फटका दवडणे कोलकात्याच्या एटीके मोहन बागानसाठी खूपच फायदेशीर ठरले. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या सदोष नेमबाजीमुळे कोलकात्याच्या संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात 2-1 आघाडी अबाधित राखत 3-2 या सरस गोलसरासरीसह सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांत 1-1 गोलबरोबरी झाली होती. विजेतेपदासाठी एटीके मोहन बागानची लढत मुंबई सिटी एफसीविरुद्ध होईल. सातव्या मोसमातील अंतिम सामना शनिवारी फातोर्डा येथे खेळला जाईल.

अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानसाठी पहिला गोल 33 वर्षीय ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्स याने 38व्या मिनिटास केला, नंतर 68व्या मिनिटास भारतीय आंतरराष्ट्रीय आघाडीपटू मनवीर सिंग याने कोलकात्यातील संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. दोन्ही गोल कर्णधार फिजी देशाचा रॉय कृष्णा याच्या असिस्टवर झाले.  74व्या मिनिटास व्ही. पी. सुहेर याने नॉर्थईस्टची पिछाडी हेडिंगद्वारे एका गोलने कमी केली, पण 83व्या मिनिटास पेनल्टी फटका गोलपट्टीवरून मारण्याची पोर्तुगीज लुईस माशादो याची चूक नॉर्थईस्टसाठी खूपच महागात पडली. येथेच त्यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात येण्यावर शिक्कामोर्तब झाले. एटीके मोहन बागानचा मनवीर सिंग सामन्याचा मानकरी ठरला.

एटीके व मोहन बागान या कोलकात्यातील संघाचे विलनीकरण झाल्यानंतर त्यांची पहिली आयएसएल अंतिम फेरी आहे, तर यापूर्वी एटीके संघाने तीन वेळा अंतिम फेरी गाठत विजेतेपद मिळविले आहे. खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली झुंजार खेळ केलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडला दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला, त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील त्यांची अपराजित मालिका 12व्या लढतीत संपुष्टात आली.

विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना डेव्हिड विल्यम्सने एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. रॉय कृष्णाने तोलूनमापून दिलेल्या पासवर डेव्हिडने नॉर्थईस्टचे बचावपटू आशुतोष मेहता व माशूर शरीफ यांना चकविले आणि फटका मारला, यावेळी चेंडू गोलपट्टीस आपटून नेटमध्ये घुसला. तासाभराच्या खेळानंतर प्रतिहल्ल्यावर मनवीर सिंगने नॉर्थईस्टच्या विस्कळीत झालेल्या बचावाचा लाभ उठवत संघाची आघाडी दोन गोलने वाढविली. मनवीरच्या डाव्या पायाचा फटका रोखणे नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाशिष रॉय याला अशक्य ठरले. 

उत्तरार्धातील कुलिंग ब्रेकला एक मिनिट बाकी असताना मोसमात जोमदार खेळ केलेल्या व्ही. पी. सुहेर याने नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी एका गोलने कमी केली. सेटपिसेसवर नॉर्थईस्टचे आक्रमण रोखणे एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याला शक्य झाले नाही. लुईस माशादोच्या कॉर्नर किकवर बेंजामिन लँबॉट याच्या हेडिंगवर चेंडू गोलपट्टीस आपटून रिबाऊंड झाला असता सुहेरने हेडिंगद्वारे चेंडू नेटमध्ये मारला. विश्रांतीनंतरच्या दुसऱ्या मिनिटास सुहेरचा फटका गोलरक्षक अरिंदमने चपळाईने अडविला होता, त्याची भरपाई करताना सुहेरने चार सामन्यात तिसरा गोल करून केली.

सामना संपण्यास आठ मिनिटांचा अवधी बाकी असताना नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरीची अप्रतिम संधी होती, पण पोर्तुगीज खेळाडू लुईस माशादो याने पेनल्टी फटका गोलपट्टीवरून मारल्यामुळे गुवाहाटीच्या संघाने बरोबरीची सुवर्णसंधी गमावली. गोलक्षेत्रात एटीके मोहन बागानच्या सुभाशिष बोस याने नॉर्थईस्टच्या इद्रिसा सिला याला अडथळा आणल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली होती. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात नॉर्थईस्टने आक्रमणाची धार वाढविली. त्यामुळे एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जवरील दबावही वाढला, पण त्याने संघाची आघाडी निसटू दिली नाही.

दृष्टिक्षेपात...

- एटीके व मोहन बागानच्या विलिनीकरणानंतर या संघाची पहिली अंतिम फेरी

- एटीके संघ 2014, 2016 व 2019-20 मोसमात अंतिम फेरीत, तिन्ही वेळेस विजेता

- ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्सचे मोसमातील 19 लढतीत 5 गोल, एकंदरीत 37 आयएसएल सामन्यांत 12 गोल

- मनवीर सिंगचे यंदा 22 लढतीत 6 गोल, एकूण 69 आयएसएल सामन्यांत 9 गोल

- व्ही. पी.सुहेर याचे मोसमातील 19 लढतीत 3 गोल

- यंदाच्या आयएसएल स्पर्धेत 6 विजय व 5 बरोबरीनंतर नॉर्थईस्ट युनायटेडचा पराभव

- यापूर्वी 2018-19 मोसमातही नॉर्थईस्ट युनायटेडची उपांत्य फेरीत माघार

- स्पर्धेत 14 गोल केलेल्या एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 22 सामन्यांत 7 असिस्ट
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com