ISL 2020-21: चर्चिल ब्रदर्सची अपराजित आगेकूच

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

स्लोव्हेनियन आघाडीपटू लुका मॅसेन याने शानदार दोन गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सला पूर्ण तीन गुण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पणजी: गोव्याच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित आगेकूच कायम राखताना सोमवारी दहा खेळाडूंसह खेळलेल्या गोकुळम केरळा संघास चुरशीच्या लढतीत 3-2 फरकाने हरविले. सामना कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर झाला. स्लोव्हेनियन आघाडीपटू लुका मॅसेन याने शानदार दोन गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सला पूर्ण तीन गुण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅसेन याने अनुक्रमे 26 व 87व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्यांदा त्याने पेनल्टी फटक्यावर लक्ष्य साधले. चर्चिल ब्रदर्ससाठी अन्य एक गोल 53व्या मिनिटास किंग्सली फर्नांडिस याने केला.

ISL 2020-21: आयएसएल विक्रमानंतर एफसी गोवाची नजर करंडकावर

गोकुळम केरळासाठी फिलिप एदजा याने 80व्या मिनिटास, तर बदली खेळाडू एम. एस. जितिन याने 90+2व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या 30व्या मिनिटास गोकुळम केरळाचा एक खेळाडू कमी झाला. त्यांचा आघाडीपटू व्हिन्सी बार्रेटो याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले. सामन्याच्या 45व्या मिनिटास केरळच्या संघाला पेनल्टी फटका मिळाला, पण चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक शिल्टन पॉल याने फिलिप एदजा याच्या फटक्याचा अचूक अंदाज बांधत चेंडू अडविला, त्यामुळे गोकुळम केरळाचे नुकसान झाले. चर्चिल ब्रदर्सचा हा 10 लढतीतील सहावा विजय ठरला.अन्य चार बरोबरीसह त्यांचे सर्वाधिक 22 गुण झाले असून ते अव्वल स्थानी कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील रियल काश्मीरवर त्यांनी पाच गुणांची आघाडी प्राप्त केली आहे. अगोदरचे सलग तीन सामने जिंकलेल्या गोकुळम केरळास स्पर्धेत चौथ्यांदा पराभवाचा झटका बसला. 10 लढतीनंतर त्यांचे 16 गुणांसह पाचवा क्रमांक कायम राहिला.

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेन याचे स्पर्धेत सर्वाधिक 7 गोल

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत 15, तर गोकुळम केरळाचे 20 गोल

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत सर्वाधिक 6 विजय, एकमेव अपराजित संघ

संबंधित बातम्या