ISL 2020-21: आयएसएल विक्रमानंतर एफसी गोवाची नजर करंडकावर

ISL 2020-21: आयएसएल विक्रमानंतर एफसी गोवाची नजर करंडकावर
ISL 202021 FC Goa eye the trophy after ISL record

पणजी:  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात चौथ्या क्रमांकासह प्ले-ऑफ फेरी गाठल्यानंतर एफसी गोवाने आता विजेतेपदाच्या करंडकाचे लक्ष्य बाळगले आहे. गतमोसमात लीग विनर्स शिल्ड पटकावलेल्या या संघाने दोन वेळा आयएसएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे, पण दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

आयएसएल स्पर्धेत सर्वाधित 13 सामने अपराजित राहण्याचा विक्रम एफसी गोवाने बजावला आहे. एफसी गोवा संघ 2014-15 मध्ये सलग 12 सामने अपराजित होता. यंदा या विक्रमाशी मुंबई सिटीने बरोबरी साधली होती. एफसी गोवाने यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादला गोलशून्य बरोबरीत रोखून नव्या विक्रमाचा मान मिळविला. 19 डिसेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे चेन्नईयीन एफसीकडून 1-2 फरकाने हार पत्करल्यानंतर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने 5 सामने जिंकले, तर 8 सामने बरोबरीत राखले. आयएसएलच्या सात मोसमात सहाव्यांदा उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रमही त्यांनी केला आहे.

यंदाच्या आयएसएल प्ले-ऑफ फेरीत एफसी गोवासमोर खडतर आव्हान आहे. गटसाखळीत अव्वल राहत लीग विनर्स शिल्ड पटकाविलेला मुंबई सिटी संघ गोव्यातील संघासाठी कठीण प्रतिस्पर्धी असेल. उभय संघांतील दोन टप्प्यातील उपांत्य फेरीतील पहिली लढत पाच मार्च रोजी फातोर्डा येथे आणि नंतर आठ मार्च रोजी बांबोळी येथे होईल. मोसमात एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात दोन लढती झाल्या. 25 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटीने 1-0 फरकाने विजय मिळविला, तर 8 फेब्रुवारी 2021 रोजी बांबोळी येथील सामना 3-3 गोलबरोबरीत राहिला. 

``करंडक  जिंकणे हा एकमेव महत्त्वाचा विक्रम आहे,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक फेरांडो यांनी सांगितले. ``हा अपराजित विक्रम महत्त्वाचा नाही. गोवा प्ले-ऑफसाठी पात्र ठरल्यामुळे मी आनंदित आहे. बहुतेक सामन्यांत आम्ही वर्चस्व राखले होते, त्याबद्दल खूष आहे,`` असे ते म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com