ISL 2020-21: एफसी गोवाचे चँपियन्स लीगला प्राधान्य

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

आशियाई (एएफसी) चँपियन्स लीगसाठी थेट पात्र ठरणारा पहिला भारतीय फुटबॉल संघ हा बहुमानही त्यांना प्राप्त झाला.

पणजी:  एफसी गोवा संघाने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग 15 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम बजावला आहे, पण ते करंडक जिंकण्याच्या बाबतीत पुन्हा कमनशिबी ठरले. स्पर्धेच्या सातव्या मोसमात उपांत्य फेरीत माघार घेतल्यानंतर स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने आता आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेवर नजर एकवटली असून त्या स्पर्धेस प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत साखळी फेरीत अव्वल राहत एफसी गोवाने लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता. त्यामुळे आशियाई (एएफसी) चँपियन्स लीगसाठी थेट पात्र ठरणारा पहिला भारतीय फुटबॉल संघ हा बहुमानही त्यांना प्राप्त झाला. आता चँपियन्स लीग स्पर्धेतील एफसी गोवाच्या मोहिमेत येत्या 14 एप्रिलपासून सुरवात होत आहे. 

आयएसएल स्पर्धेच्या सात मोसमांच्या इतिहासात एफसी गोवाने 2016चा अपवाद वगळता सहा वेळा प्ले-ऑफ (उपांत्य फेरी) गाठली. त्यापैकी चार वेळा त्यांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दोन वेळा ते अंतिम फेरीत पराभूत झाले. स्पर्धेतील एक मातब्बर संघ असूनही एफसी गोवास आयएसएल करंडक जिंकता आला नाही. यावेळच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीविरुद्ध 2-2 गोलबरोबरी झाली, नंतर दुसऱ्या टप्प्यात सोमवारी निर्धारित व जादा वेळेतील मिळून 120 मिनिटे गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर एफसी गोवास पेनल्टी शूटआऊटवर 5-6 फरकाने माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे करंडक जिंकण्याचे स्वप्नही भंगले.

ISL2020-21: गोवा आणि मुंबईसाठी अंतिमपूर्व `फायनल'

मुंबई सिटीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर माघार घेतल्यानंतर आपला संघ दोन-तीन दिवस विश्रांती घेईल आणि नंतर आशियाई चँपियन्स लीगसाठी तयारी करेल, असे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी स्पष्ट केले. प्रथमच खेळत असल्याने चँपियन्स लीग स्पर्धा भारतीय फुटबॉल, एफसी गोवा आणि भारतातील प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे, असे फेरांडो यांनी नमूद केले. पेनल्टी शूटआऊटच्या वेळेस नेहमीच दबाव असतो ही बाब मान्य करून फेरांडो याने नव्याने सज्ज होण्याची ग्वाही दिली.

 ISL 2020 -21: नॉर्थईस्टला ऐतिहासिक संधी; एटीके मोहन बागानचे खडतर आव्हान

आशियाई चँपियन्स लीगमध्ये गट साखळीत एफसी गोवाचा पहिला सामना 14 एप्रिलला कतारच्या अल रय्यान संघाविरुद्ध होईल. त्यानंतर 17 एप्रिलला अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) व अल झावरा (इराक) या संघातील विजेत्याशी एफसी गोवाची गाठ पडेल. नंतर 20 एप्रिलला इराणच्या पर्सेपोलिस संघाचे आव्हान असेल. हा इराणी संघ बलाढ्य असून चँपियन्स लीगमध्ये पश्चिम विभागातील गतवेळचा विजेता आहे. परतीच्या लढतीत 23 एप्रिलला पुन्हा पर्सेपोलिस संघाविरुद्ध, 26 एप्रिलला अल रय्यान संघाविरुद्ध, तर शेवटचा साखळी सामना 29 एप्रिलला अल वाहदा व अल झावरा यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.
 

संबंधित बातम्या