ISL 2020-21: लीग विनर्स शिल्डसाठी लढत; एटीके मोहन बागानसमोर मुंबई सिटीचे खडतर आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सध्या एटीके मोहन बागान 40 गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी आहे. मुंबई सिटी 37 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

पणजी: एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी यांच्यात होणारा सामना सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा असेल, मात्र लीग विनर्स शिल्ड पटकाविण्यासाठी आणि त्याद्वारे एएफसी चँपियन्स लीगच्या पात्रतेसाठी गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांतील लढत निर्णायक ठरेल. एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना रविवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. साखळी फेरीअखेरीस गुणतक्त्यात अव्वल राहणारा संघ लीग विनर्स शिल्डचा मानकरी ठरेल आणि या संघास एएफसी चँपियन्स लीगसाठी थेट पात्रता मिळेल. सध्या एटीके मोहन बागान 40 गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी आहे. मुंबई सिटी 37 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

ISL 2020-21 : जमशेदपूरच्या मोहिमेची विजयी सांगता

अंतोनियो हबास .यांच्या मार्गदर्शनाखालील मोहन बागानला अगोदरच्या लढतीत हैदराबाद एफसीने गोलबरोबरीत रोखले, त्यामुळे त्यांच्या एएफसी चँपियन्स लीग पात्रतेवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मुंबई सिटीने मध्यंतरीच्या खराब कामगिरीची मरगळ झटकताना ओडिशा एफसीचा 6-1 फरकाने धुव्वा उडविला. त्यामुळे साखळी फेरीअंती गुणतक्त्यात अव्वल ठरण्याची त्यांनाही संधी प्राप्त झाली. सध्या दोन्ही संघांचा गोलफरक समान +15 असा आहे. रविवारी मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला नमविल्यास त्यांचेही 40 गुण होतील. गोलफरक सरस राखल्यास सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीगसाठीही पात्र ठरेल. सामना बरोबरीत राहिला आणि एक गुण मिळाल्यास एटीके मोहन बागानची फत्ते होईल.

ISL 2020-21 : ओडिशा-ईस्ट बंगाल लढत केवळ औपचारिकता

एटीके मोहन बागानने स्पर्धेत सर्वांत कमी 13 गोल स्वीकारले आहेत. त्यांचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या नावे सर्वाधिक 10 क्लीन शीट्सची नोंद आहे. त्यामुळे मुंबई सिटी एफसीच्या आक्रमकांचा रविवारी कस लागेल. मुंबई सिटीने स्पर्धेत गोलधडाका राखताना सर्वाधिक 33 गोल नोंदविले आहेत. कोलकात्यातील संघाचा हुकमी आघाडीपटू रॉय कृष्णा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 14 गोल केले असून चार असिस्टचीही नोंद केली आहे.

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानची कामगिरी ः 19 सामने, 12 विजय, 4  बरोबरी, 3 पराभव, 40 गुण

- मुंबई सिटी एफसीची कामगिरी ः 19 सामने, 11 विजय, 4 बरोबरी, 4 पराभव, 37 गुण

- एटीके मोहन बागानच्या 10, तर मुंबई सिटीच्या 8 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे मुंबई सिटीची एटीके मोहन बागानवर 1-0 फरकाने मात

- मागील 6 सामन्यांत एटीके मोहन बागानचे 5 विजय, 1 बरोबरी
 

संबंधित बातम्या