ISL 2020-21: चर्चिल ब्रदर्सला गोकुळम केरळाचे आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा यांच्यातील स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर खेळला जाईल.

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित असलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाची करंडकाच्या दिशेने वाटचाल आहे, त्यात त्यांना बुधवारी  अडथळा येऊ शकतो. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गोकुळम केरळाचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा यांच्यातील स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर खेळला जाईल. चर्चिल ब्रदर्स 11 सामने अपराजित आहे आणि त्यांनी 25 गुणांसह अग्रस्थान भक्कम केले आहे. मागील पाच लढतीत त्यांनी चार विजय व एक बरोबरी नोंदविली आहे. गोकुळम केरळाने मागील पाचपैकी चार लढती जिंकताना 11 सामन्यांतून 19 गुणांची कमाई केली आहे. केरळचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

स्पॅनिश फर्नांडो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्स संघाची मदार होंडुरासचा क्लेव्हिन झुनिगा आणि स्लोव्हेनियाचा लुका मॅसेन या आक्रमक जोडगोळीवर असेल. त्यांनी एकत्रित 14 गोल नोंदविले आहेत. अगोदरच्या लढतीत त्यांनी रियल काश्मीरला हरविले होते. पहिल्या टप्प्यातही त्यांनी गोकुळम केरळास नमविले होते.

ISL 2020 -21: नॉर्थईस्टला ऐतिहासिक संधी; एटीके मोहन बागानचे खडतर आव्हान

आपल्या संघाने शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे, मैदानावर खेळणारे व बेंचवरील खेळाडूंचीही हीच मानसिकता आहे, असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक व्हारेला यांनी सांगितले. फुटबॉलमध्ये सहा गुणांची आघाडी खूप मोठी आहे. संघ सर्वोत्तम असून आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांत चर्चिल ब्रदर्सने वर्चस्व राखल्याचे व्हारेला यांनी नमूद केले. व्हिन्सेन्झो आल्बर्टो यांच्या मार्गदर्शनाखालील गोकुळम केरळा संघाने अगोदरच्या लढतीत पंजाब एफसीला एका गोलने हरविले होते. चर्चिल ब्रदर्सला पराभूत करून अव्वल स्थानाचे अंतर कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. आपल्या संघाने विजय मिळविल्यास लीग स्पर्धा विजेतेपदाच्या दृष्टीने साऱ्या संघांसाठी खुली होईल, चर्चिल ब्रदर्स जिंकल्यास विजेतेपदाची चुरस संपुष्टात येईल, असे व्हिन्सेन्झो यांना वाटते.

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे 11 सामन्यांत 7 विजय, 4 बरोबरी, 25 गुण

- गोकुळम केरळाच्या 11 लढतीत 6 विजय, 1 बरोबरी, 4 पराभव, 19 गुण

- पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सचा गोकुळम केरळावर 3-2 विजय

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेनचे 8, क्लेव्हिन झुनिगाचे 6 गोल

- गोकुळम केरळाच्या डेनिस अँटवी व फिलीप अदजा यांचे प्रत्येकी 5 गोल
 

संबंधित बातम्या