ISL 2020-21: 'सुपर सब` सिला नॉर्थईस्टच्या मदतीस; इंज्युरी टाईम गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरीत रोखले

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

एटीके मोहन बागानला 34व्या मिनिटाल ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने आघाडी मिळवून दिली.

पणजी: सामन्याच्या इंज्युरी टाईम खेळात बदली खेळाडू (सुपर सब) इद्रिसा सिला याने नोंदविलेल्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानला 1-1 गोलबरोबरीत रोखले. आता उभय संघात मंगळवारी  होणारी दुसऱ्या टप्प्यातील लढत निर्णायक असेल. सामना शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला.

एटीके मोहन बागानला 34व्या मिनिटाल ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने आघाडी मिळवून दिली. गिनी देशाच्या सिला याने 90+4 मिनिटास लुईस माशादो याच्या असिस्टवर सुरेख हेडिंग साधत एटीके मोहन बागानच्या बचावपटूंना, तसेच गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज यांना फसविले. सामन्याच्या 66व्या मिनिटास बेंजामिन लँबॉट याच्या जागी सिला मैदानात उतरला होता.

ISL 2021: एफसी गोवाचा जिगरबाज खेळ; मुंबई सिटीशी बरोबरी

पहिल्या टप्प्यात बरोबरी झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लढतीत दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक असेल. नॉर्थईस्ट युनायटेड आता सलग 11 सामने, तर अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली 10 लढती अपराजित आहे. पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकनंतर लगेच एटीके मोहन बागानने आघाडी प्राप्त केली. रॉय कृष्णा याच्या असिस्टवर ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्सने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. विल्सम्सने चेंडूवर नियंत्रण राखत नॉर्थईस्टच्या बचावपटूस चकवा दिला आणि नंतर त्याच्या फटक्यासमोर गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरीही हतबल ठरला.

ISL 2020-21 : एटीके मोहन बागानसमोर नॉर्थईस्टचा धोका

विश्रांतीनंतरच्या पाचव्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडचा पोर्तुगीज खेळाडू लुईस माशादो याने जोरदार मुसंडी मारली होती, यावेळी एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने जागा सोडून बॉक्सबाहेर येत माशादोला रोखले. 

दृष्टिक्षेपात...

- डेव्हिड विल्यम्सचे मोसमातील 18 लढतीत 4 गोल, एकंदरीत 36 आयएसएल लढतीत 11 गोल

- यंदा स्पर्धेत 14 गोल नोंदविलेल्या रॉय कृष्णा याचे 21 लढतीत 5 असिस्ट

- इद्रिसा सिला याचे यंदा 17 लढतीत 3 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडचे सलग 11 अपराजित लढतीत 6 विजय, 5 बरोबरी

- यंदा स्पर्धेत नॉर्थईस्टचे 32, तर एटीके मोहन बागानचे 29 गोल
 

संबंधित बातम्या