ISL 2020 -21: नॉर्थईस्टला ऐतिहासिक संधी; एटीके मोहन बागानचे खडतर आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

एटीके मोहन बागान व नॉर्थईस्ट यांच्यातील सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू मैदानावर खेळला जाईल.

पणजी: गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने यापूर्वी फक्त एकदाच इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेची उपांत्य (प्ले-ऑफ) फेरी गाठली आहे, आता दुसऱ्यांना पहिल्या चार संघात स्थान मिळविल्यानंतर अंतिम फेरी गाठल्यास त्यांच्यासाठी ती ऐतिहासिक कामगिरी ठरेल. त्यासाठी उपांत्य लढतीच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकात्याच्या एटीके मोहन बागानचे खडतर आव्हान मागे सारावे लागेल.

एटीके मोहन बागान व नॉर्थईस्ट यांच्यातील सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू मैदानावर खेळला जाईल. गेल्या शनिवारी पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास इद्रिसा सिला याने केलेल्या गोलमुळे नॉर्थईस्टने एटीके मोहन बागानला 1-1 गोलबरोबरीत रोखले होते. मंगळवारी होणारी लढत दोन्ही संघांसाठी निर्णायक असून विजयी संघ अंतिम फेरी गाठेल, पुन्हा बरोबरी झाल्यास पेनल्टी शूटआऊटचा वापर होईल.

नॉर्थईस्ट युनायटेड स्पर्धेत सलग 11 सामने अपराजित आहे, त्यापैकी 10 सामने अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील आहेत. नॉर्थईस्टने मोसमात आठ सामने जिंकले आहेत, त्यापैकी सहा वेळा जमील प्रशिक्षक होते. जेरार्ड नूस यांना डच्चू दिल्यानंतर जमील यांनी नॉर्थईस्टला नवा आत्मविश्वास मिळवून दिलेला आहे, त्याच बळावर त्यांची पुढील वाटचाल असेल. नॉर्थईस्ट युनायटेड संघ यापूर्वी 2018-19 मोसमात उपांत्य फेरीत खेळला होता, पण तेव्हा त्यांना पुढील मजल गाठता आली नव्हती. ``आम्हाला निकालावर लक्ष केंद्रित करावे लागेल, सामना करा किंवा मरा या धर्तीवर असल्याने दबाव असेलच. या दबावाचा आनंद लुटण्याचे खेळाडूंना बजावले आहे. अवे गोल नियम नसल्याने निकालासाठी झुंजावेच लागेल. त्यासाठी प्रतिस्पर्धांवर दडपण टाकण्यासाठी जास्त संधी निर्माण कराव्या लागतील,`` असे जमील यांनी सांगितले.

ISL2020-21: गोवा आणि मुंबईसाठी अंतिमपूर्व `फायनल'

नॉर्थईस्टने साखळी फेरीतील दुसऱ्या टप्प्यात अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानला हरविले. त्यानंतर कोलकात्याच्या या मातब्बर संघाने सलग पाच सामने जिंकले, मात्र मागील तीन लढतीत या संघाचा सूर काहीसा हरपलेला दिसतो. हैदराबादविरुद्ध बरोबरी आणि नंतर मुंबई सिटीविरुद्धच्या पराभवामुळे या संघा्च्या हातून लीग विनर्स शिल्ड निसटली.

उपांत्य फेरील पहिल्या टप्प्यात नॉर्थईस्टने बरोबरीत रोखल्यामुळे आता एटीके मोहन बागान संघासाठी सामना महत्त्वाचा ठरला आहे. कोलकात्याच्या संघाने पूर्ण क्षमतेने खेळ केल्यास नॉर्थईस्टसाठी सामना खूपच कठीण ठरू शकेल. दुखापतग्रस्त अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याची अनुपस्थिती एटीके मोहन बागानला पुन्हा जाणवू शकते. तो उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात खेळला नव्हता. संघावर दबाव असल्याचे एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हबास यांनी नाकारले आहे.

ISL 2020-21: 'सुपर सब` सिला नॉर्थईस्टच्या मदतीस; इंज्युरी टाईम गोलमुळे...

``आम्हाला संधी साधायची आहे आणि जी पुन्हा लाभणार नाही. उपांत्य फेरीचा आनंद लुटत खेळताना आम्हाला सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित करावी लागेल, अगदी शांत चित्ताने खेळावे लागेल,`` असे हबास यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

- मोसमातील एकमेकाविरुद्धच्या 3 लढतीत एटीके मोहन बागान व नॉर्थईस्टचा प्रत्येकी 1 विजय, 1 बरोबरी

- सलग 11 अपराजित लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडचे 6 विजय, 5 बरोबरी

- मोसमात एटीके मोहन बागानचे 12 विजय, सर्वाधिक 10 क्लीन शीट्स

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा याचे 14 गोल, 5 असिस्ट

- स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडचे 32, तर एटीके मोहन बागानचे 29 गोल 
 

संबंधित बातम्या