ISL 2020-21: प्ले-ऑफ फेरीसाठी हैदराबादला विजय अत्यावश्यक

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

एफसी गोवास बरोबरीच्या अवघ्या एका गुणाची, तर हैदराबाद एफसीला विजयाच्या पूर्ण तीन गुणांची गरज आहे.

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीसाठी तीन संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी चुरस आहे. ती मिळविण्यासाठी एफसी गोवास बरोबरीच्या अवघ्या एका गुणाची, तर हैदराबाद एफसीला विजयाच्या पूर्ण तीन गुणांची गरज आहे. एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यातील सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याचे महत्त्व लक्षात घेता रंगतदार फुटबॉल अपेक्षित आहे. दोन्ही संघ आक्रमणावर जास्त भर देतात, त्यामुळे प्रतिस्पर्धी बचावफळी दबावाखाली असेल.

एफसी गोवाचे सध्या 30, तर हैदराबादचे 28 गुण आहे. रविवारचा सामना बरोबरीत राहिल्यास 31 गुणांसह एफसी गोवा संघ एटीके मोहन बागान, मुंबई सिटी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यासमवेत प्ले-ऑफ फेरीत दाखल होईल. सामना जिंकल्यास नॉर्थईस्टइतकेच 33 गुण होतील आणि सरस गोलसरासरीवर गोव्यातील संघास तिसरा क्रमांक मिळेल. हैदराबादचे 28 गुण आहेत, त्यामुळे एफसी गोवास मागे टाकण्यासाठी त्यांना विजयाची नितांत गरज आहे. एफसी गोवा सलग 12, तर हैदराबाद एफसी 11 सामने अपराजित आहे. 

ISL 2020-21 : ओडिशा-ईस्ट बंगाल लढत केवळ औपचारिकता

90 मिनिटांत ठरणार भवितव्य

``विजयाचे पूर्ण तीन गुण आणि आक्रमक शैली ही आमची मानसिकता हैदराबादविरुद्धही कायम असेल. सामन्यातील 90 मिनिटांत आमचे भवितव्य निश्चित होईल. सध्यातरी आम्ही फक्त हैदराबादविरुद्धच्या लढतीवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे,`` असे एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. एफसी गोवाने स्पर्धेत आक्रमणावर जास्त भर देताना 31 गोल केले आहेत, त्याचवेळी 23 गोलही स्वीकारले आहेत. यासंदर्भात एफसी गोवाच्या बचावाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. त्याविषयी फेरांडो यांनी सांगितले, की ``पेनल्टी आणि सेटपिसेसवर आपला संघ जास्त गोल स्वीकारत असला तरी त्याची भिती वाटत नाही, कारण आम्ही गोलही नोंदवत आहोत.`` संघातील वीस वर्षीय युवा गोलरक्षक धीरज सिंग प्रगती साधत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्ले-ऑफ फेरीचा दावा भक्कम करताना एफसी गोवाने मागील लढतीत बंगळूर एफसीला 2-1 फरकाने हरविले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे शेवटच्या चार मिनिटांत ईशान पंडिता आणि इगोर आंगुलो यांनी केलेल्या गोलमुळे एफसी गोवाने हैदराबादला हरविले होते.

ISL 2020-21 : जमशेदपूरच्या मोहिमेची विजयी सांगता

हैदराबादचा उल्लेखनीय खेळ

स्पॅनिश मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीने स्पर्धेत 27 गोल नोंदविताना उल्लेखनीय खेळ केला आहे. मागील लढतीत सामन्यात तब्बल 85 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही त्यांनी मातब्बर एटीके मोहन बागानला 2-2 गोलबरोबरीत रोखले होते. त्या सामन्यातील रेड कार्डमुळे हैदराबादच्या चिंग्लेनसाना सिंग याला रविवारी खेळता येणार नाही. 

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाची कामगिरी ः 19 सामने, 7 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव, 30 गुण

- हैदराबाद एफसीची कामगिरी ः 19 सामने, 6 विजय, 10 बरोबरी, 3 पराभव, 28 गुण

- एकमेकांविरुद्ध आयएसएलमध्ये ः सर्व 3 लढतीत एफसी गोवा विजयी

- पहिल्या टप्प्यात वास्को येथे एफसी गोवाची 2-1 फरकाने बाजी

- हैदराबादच्या 7, तर एफसी गोवाच्या 2 क्लीन शीट्स

- एफसी गोवाच्या आल्बर्टो नोग्युएरा याचे स्पर्धेत सर्वाधित 8 असिस्ट

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 13, तर हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 10 गोल

- सलग 12 अपराजित लढतीत एफसी गोवाचे 5 विजय, 7 बरोबरी

- हैदराबाद एफसी 4 विजय व 7 बरोबरी नोंदवून सलग 11 सामने अपराजित

 

संबंधित बातम्या