ISL 2020-21: मुंबई सिटीच्या बुमूसवरील कारवाईत वाढ

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गंभीर बेशिस्त अखिलाडू कृत्य आणि गैरवर्तन या कारणास्तव शिस्तपालन समितीने बुमूस याच्यावर कडक कारवाई केली आहे.

पणजी: मुंबई सिटी एफसीचा मोरोक्कन मध्यरक्षक ह्युगो बुमूस याच्या कारवाईत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने आणखी वाढ केली आहे. आणखी दोन सामन्यांचे निलंबन आणि दोन लाख रुपयांचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी त्याला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. गंभीर बेशिस्त अखिलाडू कृत्य आणि गैरवर्तन या कारणास्तव शिस्तपालन समितीने बुमूस याच्यावर कडक कारवाई केली आहे. त्याचे एकूण निलंबन चार सामन्यांचे झाले आहे. त्यामुळे तो साखळी फेरीतील बाकी सामने खेळू शकणार नाही आणि मुंबई सिटीच्या प्ले-ऑफ लढतींसाठी उपलब्ध असेल.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर 8 फेब्रुवारी रोजी एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात मुंबई सिटीच्या बुमूसला इंज्युरी टाईममधील पाचव्या मिनिटास यलो कार्ड दाखविण्यात आले होते. एकंदरीत त्याचे हे मोसमातील चौथे यलो कार्ड ठरले.  आणि अपमानजनक भाषा वापरल्यामुळे बुमूस याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले होते.

ISL 2020-21 : इंज्युरी टाईम पेनल्टी गोलमुळे सामना बरोबरीत राखत नॉर्थईस्टने...

एफसी गोवाचा बेदिया दोषमुक्त

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने एफसी गोवाच्या एदू बेदिया याला दोषमुक्त केले आहे. चेन्नईयीन एफसीचा खेळाडू दीपक टांग्री याच्याप्रती अखिलाडू वर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणी शिस्तपालन समितीने खेळाडूचे उत्तर आणि आवश्यक पुरावे तपासल्यानंतर दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला. एफसी गोवाच्या कर्णधाराने एका सामन्याचे निलंबन पूर्ण केलेले आहे.

दरम्यान, हैदराबाद एफसीचा महंमद यासीर याच्यावरही अतिरिक्त निर्बंध न लादण्याचा निर्णय शिस्तपालन समितीने दिला आहे. 12 फेब्रुवारी रोजी ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्यास यासीरला रेड कार्ड दाखविण्यात आले होते.

संबंधित बातम्या